बेलापूर-उलवे मार्गावर रस्त्याची चाळण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

बेलापूर ते उलवे मार्गावर; तसेच पुढे उलवे नोडमध्ये बामणडोंगरी रेल्वेस्थानक परिसर, सेक्‍टर- १९ मधील अग्निशमन विभागाजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. 

नवी मुंबई : गणेश विसर्जन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले असतानाही सिडको प्रशासनाला उलवे नोडमधील खड्ड्यांचा विसर पडला आहे. बेलापूर ते उलवे मार्गावर; तसेच पुढे उलवे नोडमध्ये बामणडोंगरी रेल्वेस्थानक परिसर, सेक्‍टर- १९ मधील अग्निशमन विभागाजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. 

उलवे परिसरातील सेक्‍टर- १० ते २६ मधील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून, रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. साधारणतः  पावसाळ्यापूर्वी खड्ड्यांची दुरुस्ती केली जाते. तसे संबंधित प्रशासनामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना आदेशही दिले जातात; मात्र या भागातील खड्डे ‘जैसे थे’च आहेत. दोन दिवसांवर गणेश विसर्जन आले असल्याने, विसर्जनासाठी या खड्ड्यांमधून मार्ग काढावा लागणार आहे. शिवाय खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून परिसरात डासांचा त्रासही वाढला आहे. 

बेलापूर ते उलवे मार्गावरील खड्ड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि वाहनचालकांना रोजच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. खड्डे चुकवत मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसादरम्यान खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वारांची मोठी अडचण होते. याबाबत सिडको प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता होऊ शकला नाही. 

बेलापूर ते उलवे मार्ग आणि उलव्यातील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नवी मुंबईप्रमाणेच उलवे नोडचे नियोजनही सिडको प्रशासनामार्फत केले असल्याने हा नोडही सोई-सुविधांच्या बाबतीत उत्तम असेल असे वाटले होते. मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
- जितेंद्र कोंडस्कर, उलवे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pits on the Belapur-Ulway route