पाम बीच मार्गाला खड्ड्यांचा विळखा

पाम बीच मार्गावर खड्डे पडले आहेत
पाम बीच मार्गावर खड्डे पडले आहेत

नवी मुंबई : नवी मुंबईचा रत्नहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाम बीच मार्गाला खड्ड्यांनी घेरले आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने वाहने आदळण्याच्या घटना घडत आहेत.

पनवेल, उरणसह नवी मुंबईतील बेलापूर, सीवूड्‌स, नेरूळ या भागांतील रहिवासीही मुंबई; तसेच ठाण्याकडे जाण्यासाठी शीव-पनवेलच्या मार्गाऐवजी वाशीपर्यंतच्या प्रवासासाठी पाम बीच मार्गाला प्राधान्य देतात. त्यामुळे या मार्गावरील वर्दळ वाढली आहे. नवी मुंबईतील तरुणांचे फिरण्यासाठी आणि छायाचित्रणासाठी देखील हे आवडते ठिकाण आहे. पाम बीचजवळच ज्वेल ऑफ नवी मुंबई असल्यामुळे येथे पर्यटकांचीही गर्दी असते. पालिकेचे मुख्यालय असलेल्या किल्ले गावठाण चौकापासून आरेंजा कॉर्नरपर्यंतचे अंतर नऊ किलोमीटर आहे. पाम बीच मार्ग सिडकोने २००७ मध्ये पालिकेला हस्तांतरित केला. तेव्हा पालिकेने या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली होती. त्यासाठी १४ कोटी रुपये खर्च केले होते. 

पाम बीच मार्गाची लांबी नऊ किलोमीटर असून, त्याचा पृष्ठभाग उखडला गेला आहे. त्यात ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे अपघातांची दाट शक्‍यता निर्माण झाली होती. या मार्गावर नागमोडी वळणे असून, टायर फुटण्याचे प्रमाणही वाढले होते. ताशी ६० किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याची परवानगी असलेल्या मार्गावर भरधाव जाणाऱ्या वाहनांवर निर्बंध ठेवण्यासाठी सहा ठिकाणी सिग्नलही बसविण्यात आले आहेत. वाशी सेक्‍टर- १७ पासून बेलापूर सेक्‍टर- ११ पर्यंत सिडकोने तयार केलेल्या ११ किलोमीटर पाम बीच मार्गाची तुलना मुंबईतील मरीन ड्राइव्हच्या क्वीन नेकलेसशी केली जाते. त्यामुळे काही मिनिटांत बेलापूर किंवा वाशी गाठण्याची सवय असलेल्या या मार्गावरील नेहमीच्या वाहनचालकांना खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने ते काहीसे अस्वस्थ झाले आहेत.

सकाळपासून शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा पाहणी दौरा सुरू आहे. त्या-त्या विभागातील अभियंत्यांना खड्डे बुजविण्याचे आदेश दिले असून, लवकरच १०० टक्के खड्डे बुजविले जातील.
- सुरेंद्र पाटील, शहर अभियंता, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com