सानपाडा रेल्वेस्थानकाच्या भुयारी मार्गात खड्डे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

सानपाडा रेल्वेस्थानकाच्या पूर्व आणि पश्‍चिमेला जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत; तर मार्गातील पथदिवेही बंद अवस्थेत असल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

मुंबई : सानपाडा रेल्वेस्थानकाच्या पूर्व आणि पश्‍चिमेला जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत; तर मार्गातील पथदिवेही बंद अवस्थेत असल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

सानपाडा रेल्वेस्थानकांच्या पूर्वेला मोठी लोकवस्ती, शाळा महाविद्यालये आहेत; तर पश्‍चिमेला पुणे नाशिक महामार्ग, सायन पनवेल महामार्ग एपीएमसी मार्केट मॅफ्को मार्केट आहे. या भुयारी मार्गातून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते; मात्र भुयारी मार्गाच्या सुरुवातीला रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कंबरडे मोडले आहे. भुयारी मार्गाच्या बाहेर खड्डे पडल्याने दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने आदळत आहेत. भुयारी मार्गात कोटा लादी बसविण्यात आल्याने दुचाकी वाहने पावसामुळे घसरण्याचे प्रकार घडत असून, किरकोळ अपघातदेखील घडत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्यांची डागडुजी करावी. तसेच विजेचे दिवे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मुसळधार पावसात सानपाडा भुयारी मार्गात पाणी साचते; त्यामुळे या पाण्यातूनच वाट काढावी लागते. या खड्ड्यांमुळे येथून प्रवास करणे नकोसे होत आहे; मात्र दुसरा मार्ग नसल्यामुळे नाईलाजास्तव येथून प्रवास करावा लागतो.
- कैलास वाघ, वाहनचालक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pits on ground road line of Sanpada Railway Station