गणेशभक्‍त जाणार खड्ड्यांतून

 महामार्गाचे रखडलेले काम व रस्त्यावरील खड्डे यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पेण ते नागोठणे हे ३० किलोमीटरचे अंतर पार करण्यास दोन तासांचा कालावधी लागत आहे.
महामार्गाचे रखडलेले काम व रस्त्यावरील खड्डे यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पेण ते नागोठणे हे ३० किलोमीटरचे अंतर पार करण्यास दोन तासांचा कालावधी लागत आहे.

नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. तेव्हापासून प्रवाशांना तासन्‌तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता तर खड्ड्यांमुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सव जवळ आला असतानाही याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याने या वर्षीही बाप्पाच्या भक्तांना अशा बिकट मार्गातूनच जीव धोक्‍यात टाकून प्रवास करावा लागणार आहे. त्या संदर्भातील हा ग्राऊंड रिपोर्ट...

नऊ वर्षांपासून रखडपट्टी
गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे कोकणवासीयांना १४ वर्षांचा वनवास घडेल की काय अशी शंका येत आहे. गेल्या नऊ वर्षांत तीन वेळा या महामार्गाच्या कामाची मुदत वाढवली आहे. नागोठणे हद्दीतच महामार्गावरील दोन उड्डाणपुलांची कामे अपूर्णअवस्थेत असल्याने या ठिकाणी वापरातील रस्ता अरुंद आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे रस्त्याची धुलाई झाली आहे. यावर खडीचा रफू मारण्याचे काम अविरत सुरू आहे; मात्र टाकलेली खडी खड्डयातून बाहेर येत असल्याने पुनःपुन्हा खड्डे भरावे लागत आहेत. या खडीवरून घसरून दुचाकीस्वारांचे अपघात होण्याच्या अनेक घडना घडल्या आहेत. नागोठणे ते वाकनफाटा या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत.

कुंडलिका पुलावरही खड्डे
वाकनफाट्यावरील नदीवर टाकलेल्या नव्या पुलाचे काम अजून अपूर्णाअवस्थेत असल्याने जुन्या अरुंद पुलावरून वाहतूक सुरू आहे; मात्र या पुलावरही खड्डे झाले आहेत. वाकनफाटा ते सुकेळी, खांब, पुगाव, कोलाड हा सर्व रस्ता खराब आहे. रस्त्याची अवस्था बिकट असल्याने एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. कोलाडजवळ कुंडलिका नदीवरील नव्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे; मात्र या नव्या पुलावर सर्वत्र खड्डे आहेत. त्यामुळे नव्यापेक्षा जुनाच पूल बरा असे म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे. कोलाड येथे वरसगाव फाट्यावर पडलेल्या खड्डयातसुद्धा खडी भरण्याचेच काम सुरू आहे. त्यापुढे रातवडपर्यंत या रस्त्याची स्थिती खराब आहे.

चालकांना त्रास
सलग रस्ता होत नसल्याने या महामार्गावर अनेक ठिकाणी पर्यायी रस्ते झाले आहे. या ठिकाणचे रस्ते कच्च्या खडीचे असल्याने चालकांना या ठिकाणी गाडीला ब्रेक लावून सावकाश गाडी न्यावी लगते. दुचाकीस्वार तर अक्षरशः वैतागले असून दुचाकी स्लीप होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

जमिनीची विक्री थांबली
मुंबई-गोवा महामार्गालगत असणाऱ्या जागांवर संपादन प्रक्रियेचे शेरे पडले आहेत. ज्या ठिकाणी शेरे पडले आहेत अशा जमिनी विक्रीकरिता बंदचे आदेश असल्याने या ठिकाणची खरेदी-विक्री व्यवहार गेली तीन वर्षे ठप्प झाले आहेत. एखादा शेतकरी आर्थिक अडचणीत आला तरी आपली जागा विकू शकत नसल्याने त्यास मानसिक त्रास होत आहे.

निधीची कमतरता
इंदापूर ते वडपाले यादरम्यान भूसंपादनासाठी २०१६-१७ मध्ये लोणेरे वगळता २५ गावांना ५२६ कोटी रुपये आले होते. अजूनही या गावांसाठी अद्याप अंदाजे १८३ कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे; मात्र त्याबाबत कोणत्याही हालचाली सध्या होताना दिसून येत नाहीत. लोणेरे गावाच्या संपादन प्रक्रियेसाठी सुमारे १५० कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे.

कंत्राटदारांना फटका
दुसऱ्या टप्प्यातील इंदापूर ते वडपाले याचे कंत्राट चेतक एंटरप्राईजला; तर वडपाले कशेडीपर्यंतचे काम एलएनटी या कंपनीला दिले आहे. काही शेतकाऱ्यांना मोबदला दिला नसल्याने या शेतकऱ्यांच्या जागा घेऊन रस्ता तयार करता येत नाही. त्यामुळे सलग रस्ता तयार करताना कंत्राटदारांना समस्या येत आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी आणलेल्या साधनसामुग्रीचा उपयोग होत नाही. त्यांना आर्थिक फटका बसत आहे.

सीसी टीव्हीचा वॉच
गणेशभक्‍तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सीसी टीव्हीची मदत घेतली जाणार आहे. गणेशोत्सवासाठी महामार्गावर महत्वाच्या २२ ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसेच बस स्थानकातही सीसी टीव्हीची देखरेख राहणार आहे. 

अवजड वाहनांना बंदी 
मुंबई-गोवा महामार्गावर ३० ऑगस्टपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात येणार असल्याची शक्‍यता आहे. गणेशोत्सव काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी हा निर्णय दरवर्षी घेण्यात येतो. 

दरड कोसळण्याची भीती
लोणेरे अलीकडे काँक्रीटीकरणाचा दुसरा मार्गही खुला करण्यात आलेला आहे. वीरपासून चांढवेपर्यंत रस्त्याला काही ठिकाणी खड्डे आहेत. त्याहीपेक्षा पुढील रस्ता वाहतुकीला चांगला असला, तरी दरड व माती कोसळण्याची भीती या मार्गावर दिसते. गांधारपाले गावानजीक रस्ता अरुंद असल्याने वाहतूककोंडी जाणवते. केंबुर्ली व नडगावजवळ दरडीचा धोका मात्र कायम आहे. नातेखिंड व राजेवाडी फाटा येथे असलेली वळणे धोकादायक असून येथे खड्डेही पडलेले आहेत. नातेखिंडीत महाड व रायगडकडे जाणाऱ्या रस्त्यामुळे चौक तयार झाला आहे. तेथे उड्डाणपुलाचे कामही सुरू असल्याने खोदाई करण्यात आलेली आहे; तर म्हाप्रळ व पुणे रस्ता राजेवाडी फाट्याजवळ एकत्र आल्याने येथेही उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. वाहन चालवताना या ठिकाणी लक्ष्य विचलित होत असल्याने येथे दक्षता घ्यावी लागणार आहे.

सावित्री पुलावरील वीजपुरवठा बंद
नडगावजवळचा भाग दरडीमुळे धोकादायक आहे. एका बाजूला डोंगरखोदाईमुळे धोका; तर दुसरीकडे सावित्रीचे पात्र अशा कात्रीतून येथील दोनशे मीटरचा प्रवास करावा लागतो. नडगाव, विसावा कॉर्नर, एमआयडीसी कॉर्नर येथे खड्डे पडले आहेत. या भागात सावित्री पूल, मोहप्रे पूल व माणगाव पूल असे तीन मोठे पूल आहेत. सावित्री पुलावरील वीजपुरवठा बंद आहे. माणगाव-महाड असा प्रवास करताना रस्ता चांगला व खड्डे कमी, अशी स्थिती असली तरीही नडगाव, केंबुर्ली, मोहप्रे वळण, नातेखिंड व राजेवाडी फाटा येथे वाहने सावधगिरीने चालवावी लागणार आहेत. अशा धोकादायक ठिकाणी रस्त्याचे काम करणाऱ्या एल ॲण्ड टी कंपनीने आपली यंत्रसामुग्री तयार ठेवलेली दिसत आहे. तसेच डायव्हर्शन, लाल दिवे, नामफलक व सुरक्षा व्यवस्था दिसत आहे.

काही ठिकाणी विनाअडथळा प्रवास 
माणगावमधून निघाल्यानंतर येथील खड्डे बुजवले असल्याने वाहनांना अडथळा येत नाही. नवीन महामार्गाच्या कामाला बायपास असल्याने माणगाव ते मुगवली फाट्यापर्यंत वाहन चालवताना त्रास नाही. मुगवली फाट्यापासून नवीन चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यातील काही रस्त्याचे काँक्रीटीकरणही झालेले आहे. माणगावपासून महाड जवळील वीरपर्यंत वाहने चालवण्यात अडथळाच नाही. तळेगाव व आविष्कार नर्सरीजवळ दोन ठिकाणी वळणे असली तरी ती त्रासदायक नाहीत.

पेण रेल्वे स्टेशनसमोरील रामवाडी पुलावर सुरू असलेल्या कामामुळे या पुलावरील वाहतूक एका बाजूने सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते.

उंबर्डे फाटा : खाचर खिंड येथे महामार्गाची एक बाजू अपूर्ण असल्याने वाहने एकाच बाजूकडून प्रवास करतात. या वेळी दोन्ही बाजूकडील वाहने समोरासमोर येत असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. या ठिकाणी कोणतेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत.

उचेडे उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत आहे. या पुलाचे कामही अपूर्ण असल्याने मुंबईकडे जाणारी वाहने या पुलावर आल्यावर वाहतूक कोंडी होते.

कांदळे पाडा येथे गोव्याकडे जाणारा ‘वडखळ‘ बायपास रस्ता सुरू होतो. अवजड वाहने व अलिबागकडे जाणारी वाहने या मार्गावरून जात असतात. तसेच वडखळकडून येणारी वाहने या पॉईंटवर एकत्र येत असल्याने वाहतूक कोंडी होते. येथे दिशादर्शक फलक असून नसल्यासारखे आहेत.

‘वडखळ’बायपास उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्याने या पुलावर अपघाताची भीती आहे. डोलवी बाजूकडे जाताना पुलाच्या मध्यभागी काम अपूर्ण आहे. वाहनचालकांना येथून जाताना सावधानता बाळगावी लागते.

जे. एस. डब्ल्यू. स्टील कंपनीजवळ रस्ता एकदम अरुंद व खड्डेमय आहे. कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर पुलाचे खांब उभे करण्यात आले आहेत. कंपनीत जाणारी मालवाहतूक वाहने व बसेस यामुळे येथे रोजच वाहतूक कोंडी होत असते.

गडब गावाजवळ रस्ता अरुंद असून अपघात होण्याची शक्‍यता आहे. गावाच्या पूर्वेला असलेल्या शाळेत जाण्यासाठी शेकडो मुलांना जीव धोक्‍यात घालून रस्ता ओलांडावा 
लागत आहे. 

पळस येथील उड्डाणपूल अर्धवट आहे. सर्व्हिस रोड अरुंद असून गोव्याकडे जाणारा रस्ताही खराब झालेला आहे. पळस गावासमोर काम सुरू असलेल्या पुलाचे साहित्य रस्त्यालगत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्‍यता भीती आहे.

नागोठणे शहरात प्रवेश करणारे तिन्ही मार्ग धोकादायक आहेत. येथील रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेले असून वाहतूक कोंडी होत आहे.

नवा मार्ग इंदापूर व माणगावच्या बाहेरून जात असला, तरी ते काम अजून अपूर्ण अवस्थेत आहे. इंदापूर व माणगाव शहारात असलेला रस्ता अरुंद असल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याची बाब आहे. गणेशोत्सव काळात एसटी व खासगी गाड्यांची वर्दळ वाढत असल्याने या ठिकाणी हमखास वाहतूक कोंडी होते.
- गणपत खरात, माणगाव.

रस्त्यात वळणमार्ग असलेल्या ठिकाणी फलक आहेत; मात्र फलकावर लाईटची व्यवस्था केली नसल्याने रात्रीच्या वेळी वाहन चालवताना तारांबळ उडते.
- पप्पू मोरबेकर, रिक्षाचालक.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम वेगात सुरू आहे. खड्डे बुजवण्यासाठी खडी व डांबर मिश्रणाचा वापर करण्यात येत आहे. २५ तारखेपर्यंत सर्व खड्डे बुजवण्याचे आमचे लक्ष्य आहे. मात्र यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत. येत्या २७ तारखेपर्यंत सर्व खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण होईल.
- प्रशांत फेगडे, 
प्रकल्प व्यवस्थापक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) 

सावित्री नदीवरील नवीन पूल उद्‌घाटनप्रसंगी २०१९ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण झालेले असेल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. भूसंपादन होण्याबाबत स्थानिक संभ्रमात आहे.
- प्रमोद घोसाळकर, 
काँग्रेस जिल्हा अध्यक्ष, रायगड

लोणेरेची संपादन प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. लोणेरे व इतर गावांतील शिल्लक शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी निधी उपलब्ध नाही. तो कधी येईल हे सध्या सांगता येणार नाही. निधी उपलब्ध झाला की मोबदला वाटप करण्यात येईल.
- प्रशाली दिघावकर, उपविभागीय अधिकारी (प्रांत), माणगाव
माझी रेपोली येथील हायवेलगतची जागा रुंदीकरणात गेली असून त्या मोबदल्यासाठी दीड वर्षापूर्वी नोटीस मळाली आहे, परंतु अद्याप मला मोबदला मिळाला नाही. प्रांत कार्यालयात गेली अनेक महिने फेऱ्या मारूनही मला मोबदल्याचे पैसे मिळत नाहीत.
- शंकर नाडकर, शेतकरी, रेपोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com