ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेर खड्डे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

आयटी हब म्हणून ओळख असलेल्या ऐरोलीतील रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिम बाजूला असणाऱ्या रिक्षा स्टॅण्ड नजीकच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे या ठिकाणी असणाऱ्या रिक्षाचा वेग संथगतीने होत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

नवी मुंबई : आयटी हब म्हणून ओळख असलेल्या ऐरोलीतील रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिम बाजूला असणाऱ्या रिक्षा स्टॅण्ड नजीकच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे या ठिकाणी असणाऱ्या रिक्षाचा वेग संथगतीने होत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यातच रिक्षाचालकांना खड्डा चुकवत रिक्षा चालवावी लागत असल्याने अपघाताची शक्‍यता वर्तवली जात आहे.

ऐरोली रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिम बाजूला नागरी वसाहत आहे; तर विटावा येथील रेल्वेपुलाखाली होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे चाकरमानी हे ऐरोली रेल्वेस्थानकावरून ऐरोली नॉलेज पार्क परिसरात रिक्षाने प्रवास करतात. त्यामुळे स्थानकाच्या पश्‍चिम बाजूला मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक हे प्रवाशांसाठी थांबलेले असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यातच ऐरोली रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिमेला मान्सूनमध्ये खड्डे पडल्याने, या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत आहे. या खड्ड्यातून रिक्षा गेल्यानंतर खड्ड्यातील पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

स्थानकाच्या बाहेर रिक्षाचालकांची प्रवाशांसाठी सुरू असणारी चढाओढ व परिसरात होत असणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच या ठिकाणच्या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ऐरोली रेल्वेस्थानकाबाहेर संध्याकाळच्या वेळी लागत असणाऱ्या रिक्षांमुळे या ठिकाणी रस्त्यावरून चालणेदेखील जिकिरीचे होऊन जाते. त्यातच पावसाने पडलेल्या खड्ड्यांमुळे येथे वाहतूक कोंडीत आणखनीच भर पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने येथील खड्डे बुजवावेत.
- राहुल जोते, नागरिक 

ऐरोली रेल्वेस्थानकाबाहेर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करून तत्काळ खड्डे बुजवण्यात येतील.
- गिरीश गुमास्ते, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महापालिका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pits outside the Airoli Railway Station