खड्डेमय रस्त्यांमुळे सर्व स्तरातून संताप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

ठाण्यातील खड्डेमय रस्ते सोशल मीडियावर विनोदाचा भाग झालेले आहेत. असे असताना खड्डे बुजविण्यासाठी प्राधान्य देण्याऐवजी बांधकाम विभाग मात्र, जेट पॅचर यंत्राचे दोन कोटींचे प्रस्ताव करण्यात गुंतल्याचे चित्र आहे. 

ठाणे: ठाण्यातील खड्डेमय रस्ते सोशल मीडियावर विनोदाचा भाग झालेले आहेत. असे असताना खड्डे बुजविण्यासाठी प्राधान्य देण्याऐवजी बांधकाम विभाग मात्र, जेट पॅचर यंत्राचे दोन कोटींचे प्रस्ताव करण्यात गुंतल्याचे चित्र आहे. 

बांधकाम विभागाकडून पावसाच्या संततधारेमुळे खड्डे बुजविण्यात अडचणी येत असल्याचा दावा केला जात आहे. नगर अभियंता म्हणून रवींद्र खडताळे यांनी कारभार सांभाळल्यापासून शहरातील खड्डे बांधकाम विभागाला दिसेनासे झाल्याचे चित्र आहे. खडताळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्याकडून त्याला कधीही प्रतिसाद मिळत नाही. तसेच यापूर्वी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाल्यानंतर त्याची छायाचित्रे तत्काळ उपलब्ध करून दिली जात असत; तसेच कोणत्या ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे, याची माहिती दिली जात होती. 

ठाण्यातील चरई, रेल्वेस्थानक रस्ता, घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोड, कासारवडवली, आनंदनगर, वाघबीळ, कापूरबावडी, वागळे टीएमटी बस डेपो रोड, सावरकर नगर, कोरम मॉल, तीन पेट्रोल पंप, आदी सर्व ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. यापूर्वी बांधकाम विभागाकडून पावसाळ्यात कोल्ड मिक्‍स या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचा दावा केला जात होता. पाऊस सुरू असतानाही हे तंत्रज्ञान वापरून रस्त्यावरील खड्डे तात्पुरते बुजविता येतात. पण यंदा असे कोणतेही काम होत नसल्याने बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यातच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी खड्डे बुजविण्याची जबाबदारी ठेकेदारांची असल्याने यासाठी महापालिकेचा निधी वापरू नये, अशी तंबी दिली आहे. ठेकेदारांना मदत करण्याचा प्रयत्न झाल्यास अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठाण्यात खड्डे बुजवण्याचे घोंगडे अद्यापही भिजतच राहणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pits in thane