कल्याण: प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरु

सुचिता करमरकर
रविवार, 16 जुलै 2017

गणेशोत्सवात भाविक देखावा तयार करण्यासाठी थर्मोकोलचा वापर करतात, हे पाहता त्यावर पुर्नप्रक्रिया करणाऱ्या सामाजिक संस्थेला पालिका सहकार्य करणार आहे. घरातील थर्मोकोल कचराकुंडीत न टाकता तो या प्रकल्पाचे संयोजक असलेल्या कैलास देशपांडे यांच्याकडे द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. 9820433581 या क्रमांकावर देशपांडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेने जाहिर केलेल्या प्लॅस्टिक बंदीवर आजपासून प्रभावी अंमल बजावणी सुरु करण्यात येणार आहे. जनजागृती करत प्लॅस्टिकचा वापर कमी करणे तसेच कापडी पिशव्यांचा पर्याय नागरिकांना उपलब्ध करुन देणे या सुत्रावर आधारित कार्यक्रम राबवण्यासाठी पालिकेने शहर स्तरावर एक समिती स्थापन केली आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी या उपक्रमात सहभागी होऊन तो यशस्वी करतील असा आशावाद महापौर राजेंद्र देवळेकर यांनी याविषयी घेण्यात आलेल्या बैठकीत व्यक्त केला. 

प्लॅस्टिकच्या वापराने गटारे, नाले तुंबण्याचे प्रकार वाढत आहेत. डंपिंग ग्राउंडवर जमा होणाऱ्या कचऱ्यातही प्लॅस्टिकचे प्रमाण अधिक आहे. केंद्र तसेच राज्य सरकारने यापूर्वीच प्लॅस्टिकच्या वापरावर निर्बंध आणले आहेत. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने समस्या जैसे थे आहे. स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून पालिकेने प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. या मोहिमेत नागरिकांचा सहभाग असावा या दृष्टीने महापौरांनी पालिका स्तरावर एका मध्यवर्ती समितीची स्थापना केली आहे. यात पालिकेचे सर्व पक्षीय पदाधिकारी, पालिका आयुक्त पी वेलारसू यांच्यासह काही अधिकारी, तसेच नागरिक प्रतिनिधींचा समावेश आहे. बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नरेश चंद्र, डॉ उल्हास कोल्हटकर, मागील काही दिवसांपासून उर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून काम करणाऱ्या स्नेहल दिक्षीत, डॉ स्वाती गाडगीळ यांचा समावेश आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून प्रत्येक नगरसेवकाने स्वतःच्या प्रभागात 25 नागरिकांची एक समिती तयार करायची आहे. या समितीने प्रत्येक सोसायटीत जाऊन नागरिकांमधे प्लॅस्टिकचा वापर करु नये किंवा कमी करावा याबाबत जनजागृती करतील. आपल्या घरातच कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची माहिती देतील.

पालिका स्तरावरही या बंदीनंतर व्यावसायिक स्तरावर वापरल्या जाणाऱ्या पिशव्या तसेच अन्य साहित्य याबाबत कडकपणे कारवाई केली जाईल. यासाठी पालिकेने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निश्चित केले आहे. शहरात याविषयावर काम करणाऱ्या संस्थांना बळ देण्याबाबतही पालिका विचार करत आहे. डोंबिवलीत प्लॅस्टिक गोळा करून तो पुण्याला इकोफ्युएल बनवणाऱ्या कंपनीला देणाऱ्या उर्जा फाउंडेशन समवेत पालिकाही काम करत आहे. 

गणेशोत्सवात भाविक देखावा तयार करण्यासाठी थर्मोकोलचा वापर करतात, हे पाहता त्यावर पुर्नप्रक्रिया करणाऱ्या सामाजिक संस्थेला पालिका सहकार्य करणार आहे. घरातील थर्मोकोल कचराकुंडीत न टाकता तो या प्रकल्पाचे संयोजक असलेल्या कैलास देशपांडे यांच्याकडे द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. 9820433581 या क्रमांकावर देशपांडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: plastic ban in Kalyan dombivali municipal area