प्लॅस्टिकबंदीमुळे यंदा "तुंबई' नाही;

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

मुंबई - प्लॅस्टिकबंदीमुळे दर वर्षीच्या तुलनेत मुंबईत यंदा जास्त पाऊस होऊनही पाणी तुंबले नाही, असा दावा मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात बुधवारी केला. मशिनद्वारे नालेसफाई केल्याचाही चांगला परिणाम झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

मुंबई - प्लॅस्टिकबंदीमुळे दर वर्षीच्या तुलनेत मुंबईत यंदा जास्त पाऊस होऊनही पाणी तुंबले नाही, असा दावा मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात बुधवारी केला. मशिनद्वारे नालेसफाई केल्याचाही चांगला परिणाम झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

पालिकेच्या म्हणण्यानुसार, दादर हिंदमाता, सायन, परेल या सखल भागांत दर वर्षीप्रमाणे यंदाही पाणी साचले; परंतु प्लॅस्टिकबंदीमुळे तुलनेत हे प्रमाण कमी होते. दुसरीकडे नालासोपारा, वसई-विरार भागात पावसामुळे आठवडाभरानंतरही परिस्थिती पूर्ववत झाली नाही. मुंबईत रस्ते वाहतूक खोळंबली असली, तरी लोकांचे हाल झाले नसल्याचा दावाही पालिकेने केला. कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी राज्य सरकारने 10 वर्षांपासून जागा दिली नाही, असे सांगत पालिकेने शहराच्या समस्यांचे खापर राज्य सरकारच्या माथी मारले. जितका कचरा कमी, तितके पाणी तुंबणे कमी होईल, असेही पालिकेने सांगितले. त्यावर तुम्ही आमच्यासमोर म्हणून हे चकचकीत चित्र निर्माण करताय का? असा खोचक सवाल न्या. रणजित मोरे आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी विचारला. हीच वस्तुस्थिती असल्याचे सांगत पालिकेने या दाव्याचे समर्थन केले. अनेक वर्षे रेल्वेचे सहकार्य मिळत नव्हते; परंतु यंदा त्यांनीही मदत केली. सगळ्यांनी सहकार्य केल्यास पाणी तुंबण्याची समस्या सुटू शकेल, असा युक्तिवाद पालिकेने केला.

मॅनहोलचा प्रश्‍न
गेल्या वर्षी मॅनहोलमध्ये पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत शहरात 1 हजार 425 मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. 840 ठिकाणी हे काम बाकी आहे. ऑगस्टअखेरपर्यंत ते पूर्ण होईल, असे पालिकेने सांगितले.

Web Title: plastic ban mumbai tumbai rain water