प्लास्टिक बंदीला हरताळ

मयूरी चव्हाण काकडे 
सोमवार, 30 एप्रिल 2018

डोंबिवली - राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. प्लास्टिक बंदीतून दुधाच्या पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्यांना वगळ्यात आले आहे; मात्र त्यामागेही एक विशिष्ट अनामत रक्कम भरावी लागणार असून पिशवी आणि बाटली परत केल्यानंतर ग्राहकाला ती रक्कम परत मिळणार आहे; मात्र मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर बसवण्यात येणाऱ्या वॉटर व्हेंडिंग मशीन केंद्रावर अशी कोणत्याही प्रकारची अनामत रक्कम घेण्यात येत नसून प्रवासी झटपट आणि सोपा उपाय म्हणून प्लास्टिकच्या बाटलीसह पाणी विकत घेऊन मार्गस्थ होत आहे. या प्लास्टिकच्या बाटल्या वापरून झाल्यानंतर अनेकदा रेल्वे रूळ किंवा इतर ठिकाणी फेकून दिल्या जात आहेत.

डोंबिवली - राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. प्लास्टिक बंदीतून दुधाच्या पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्यांना वगळ्यात आले आहे; मात्र त्यामागेही एक विशिष्ट अनामत रक्कम भरावी लागणार असून पिशवी आणि बाटली परत केल्यानंतर ग्राहकाला ती रक्कम परत मिळणार आहे; मात्र मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर बसवण्यात येणाऱ्या वॉटर व्हेंडिंग मशीन केंद्रावर अशी कोणत्याही प्रकारची अनामत रक्कम घेण्यात येत नसून प्रवासी झटपट आणि सोपा उपाय म्हणून प्लास्टिकच्या बाटलीसह पाणी विकत घेऊन मार्गस्थ होत आहे. या प्लास्टिकच्या बाटल्या वापरून झाल्यानंतर अनेकदा रेल्वे रूळ किंवा इतर ठिकाणी फेकून दिल्या जात आहेत. त्यामुळे वॉटर व्हेंडिंग मशीनचा पर्याय सोईस्कर असला, तरी भविष्यात प्लास्टिकची मोठी समस्या निर्माण करणारा आहे.

मध्य रेल्वेच्या दिवा, ठाकुर्ली, डोंबिवली, कल्याण आदी रेल्वे स्थानकांवर वॉटर व्हेंडिंग मशीन सुरू करण्यात आले असून यास प्रवाशांचा प्रतिसादही मिळत आहे. या ठिकाणी प्रवाशांजवळ स्वतःची पाण्याची बाटली असेल, तर वेगळे दर आकारले जातात; मात्र स्वत:ची बाटली नसल्यास पाण्याच्या मोजमापानुसार या केंद्रातूनच थेट पाण्यासह प्लास्टिक बाटल्याही प्रवाशांना विकत दिल्या जातात. बहुतांश वेळा प्रवासी थेट या केंद्रातूनच प्लास्टिक बाटली विकत घेतात. पाणी पिऊन झाल्यानंतर प्लास्टिकच्या बाटल्या रेल्वे रूळावर टाकतात. या बाटल्यांची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी ठोस उपायोजना नसल्यामुळे यावर लवकर मार्ग काढण्याची आवश्‍यकता आहे. 

प्लास्टिकच्या बाटल्या देण्यावर निर्बंध असले पाहिजेत. प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर केला तरी त्यावर उपाय काय? त्याची विल्हेवाट कशी लावायची? याबाबत कोणतेही ठोस निर्णय घेतले गेले नाहीत. अमेरिकेमध्ये कचऱ्यामधून प्लास्टिक वेगळे करून नंतर त्यावर प्रक्रिया केली जाते. प्लास्टिक चुकीचे नाही; पण त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे.
- डॉ. सूर्यकांत येरागी, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

व्हेंडिंग मशीन हे ग्राहकांना पाणी देण्यासाठी ठेवले आहे. त्यामुळे तेथे कागदी ग्लासचा वापर करता येईल. नागरिकांनी पाणी भरण्यासाठी शक्‍यतो स्वतःची बाटली ठेवावी. प्लास्टिक बाटल्या जमा करण्यासाठी काही ठिकाणे निश्‍चित करून नंतर त्यावर प्रक्रिया करता येऊ शकते.
- स्नेहल दीक्षित, सदस्या, ऊर्जा फाऊंडेशन

नागरिक नेहमी स्वतःची सोय पाहतात; मात्र प्लास्टिकचा कमी वापर करत प्रवाशांनी स्वतःजवळ स्टीलची बाटली बाळगावी. रेल्वेचा आवाका मोठा आहे. या बाटल्या जमा करण्यासाठी रेल्वेने प्रयोजन करून नंतर त्यावर प्रक्रिया करावी. रिसायकल प्लांट तयार करावेत. 
- आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना

Web Title: Plastic Banned Strike