प्लास्टिकमुक्त मुलुंडसाठी महिलांचा एल्गार 

प्लास्टिकमुक्त मुलुंडसाठी महिलांचा एल्गार 

मुंबई - डम्पिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीने हैराण झालेल्या मुलुंडमधील महिलांनी प्लास्टिकविरोधात युद्ध पुकारले आहे. त्यांनी मुलुंड प्लास्टिकमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. मुलुंडमधील महिलांचा निर्भया ग्रुप प्लास्टिक गोळा करून पुण्यात प्रक्रिया करण्यासाठी पाठवत आहे. हा प्रक्रिया प्रकल्प मुलुंड मध्येही उभारण्याचा त्यांचा विचार आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 300 किलो प्लास्टिकपासून इंधन बनवले आहे. 

मुंबईतील कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण मोठे असल्याने कचऱ्याच्या विघटनास उशीर लागतो. त्यातून डम्पिंगला आग लागण्याचे प्रमाणही वाढते. प्लास्टिकमुळे ही आग भडकते. यातून मुलुंडची सुटका करायची तर डम्पिंगवर येणारे प्लास्टिक थांबवायला हवे, असा निर्धार करत निर्भया ग्रुपच्या महिला रस्त्यावर उतरल्या; पण या प्लास्टिकचे करायचे काय, असा प्रश्‍न होता. बरीच शोधाशोध केल्यावर पुण्यात प्लास्टिकपासून इंधन बनवण्याचा प्रकल्प सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. पुण्यातील कंपनीशी चर्चा केल्यावर त्यांनी प्लास्टिकवर प्रक्रिया करून देण्यास होकार दिला. मुंबईसमोर आदर्श उभा करण्यासाठी त्यांनी मुलुंडपासून प्लास्टिकमुक्तीची सुरुवात केली. 

गेल्या महिन्यात पहिल्याच प्रयत्नात मुलुंडमधील 200 ते 300 किलो प्लास्टिक कचरा पुण्यात प्रक्रिया करण्यासाठी पाठवला. हा प्रकल्प मुलुंडमध्येही उभारण्याचा विचार आहे, असे निर्भया ग्रुपच्या अस्मिता गोखले यांनी सांगितले. मुलुंडपाठोपाठ मुंबईही प्लास्टिकमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्लास्टिक जमा केले जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण मुलुंडमध्ये जनजागृती सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

नगरसेवकही पाठीशी 
भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनीही प्लास्टिकमुक्तीच्या लढ्याला साथ दिली आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडून जागा देण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन शिंदे यांनी या महिलांना दिले आहे. प्लास्टिकविरोधात मुलुंडमध्ये चळवळ उभी राहिली आहे. या चळवळीला लोकप्रतिनिधी म्हणून प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे, असे शिंदे यांनी सांगितले. 

बुलेट रॅली ते प्लास्टिकमुक्ती 
गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेत बुलेट मोटारसायकलस्वार म्हणून सहभागी होणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन निर्भया ग्रुपची स्थापना केली. त्यांनी आपले काम फक्त महिलांना संरक्षणाचे धडे देणे, त्यांना स्ववलंबी बनवणे एवढ्यापुरते मर्यादित न ठेवता मुंबईतील प्रमुख समस्या सोडवण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com