'अंकुर' सामाजिक संस्थेमार्फत शहरात 'प्लास्टीमॅन' उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून "अंकुर' या सामाजिक संस्थेमार्फत महापालिकेच्या नेरूळ व बेलापूर येथील शाळांमध्ये प्लास्टीमॅन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

नवी मुंबई : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून "अंकुर' या सामाजिक संस्थेमार्फत महापालिकेच्या नेरूळ व बेलापूर येथील शाळांमध्ये प्लास्टीमॅन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांना या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

प्लास्टिक समस्येबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्याच्या उद्देशाने "अंकुर' या सामाजिक संस्थेमार्फत महापालिका शाळांमध्ये "प्लास्टीमॅन' उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांनाही प्लास्टिकच्या वाढत्या समस्येची जाणीव व्हावी. प्लास्टिकमुक्तीसाठी त्यांचाही सहभाग मिळावा, या हेतूने हा उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी संस्थेमार्फत कचरा वर्गीकरण, मातीविरहित ओल्या कचऱ्याच्या साह्याने बागनिर्मिती, शून्य कचरा संकल्पना अशा विविध विषयांवर कार्यशाळा घेतल्या जातात. गृहसंकुलांमध्येही मार्गदर्शन सत्रही आयोजित केली जातात. या उपक्रमांवर काम करत असताना घरात निर्माण होणारा छोटा प्लास्टिक कचरा, शाम्पूचे-सॉस किंवा इतर वस्तूंच्या छोट्‌या पिशव्या, खाद्यपदार्थांचे रॅपर यांसारखे प्लास्टिक; सुका कचरा म्हणून थेट डम्पिंगवरच जात असल्याचे या संस्थेच्या सदस्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा कचरा जमा करण्यासाठी प्लास्टीमॅन हा उपक्रम हाती घेतला आहे. 

प्लास्टिकच्या बाटल्या प्रत्येक महिन्याला महापालिका शाळांमधून संस्थेमार्फत संकलित केल्या जाणार आहेत. या जमा केलेल्या बाटल्या पुणे येथील प्लास्टिकपासून पॉलीफ्युएल बनविणाऱ्या रुद्र एन्व्हायर्न्मेंटल सोल्युशन या उद्योगसमूहाकडे पुनर्निर्मितीसाठी पाठवल्या जाणार आहेत. शहर प्लास्टिक व थर्माकोलमुक्त राहावे याकरता आपले सक्रिय योगदान देणाऱ्या अंकुर सामाजिक संस्थेच्या प्लास्टिमॅन या उपक्रमाची महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रशंसा केली व उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांचे सहकार्य अंकुर सामाजिक संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांना मिळते. प्लास्टीमॅन हा उपक्रम पालिकेच्या सहकार्याने यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. 
- गीता देशपांडे, अंकुर संस्था.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Plastiman' activity in city through 'Ankur' social organization