अंकुर सामाजिक संस्थेमार्फत 'प्लास्टिमॅन' उपक्रम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

भविष्यात मोठी समस्या निर्माण करणाऱ्या या कचऱ्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता "अंकुर' सामाजिक संस्थेमार्फत "प्लास्टिमॅन' उपक्रम राबवला जाणार आहे.

नवी मुंबई : प्लास्टिक कचरा म्हटले की पिशव्या, बॉटल, कटलरी असाच कचरा डोळ्यासमोर येतो. यातील बहुतांश कचरा पुनर्प्रक्रियेसाठी पाठवला जातो; मात्र चॉकलेट, बिस्कीटचे रॅपर, शॅम्पूची पाकिटे डम्पिंगवर पुनर्प्रक्रियेशिवाय वर्षानुवर्षे पडून राहतात. भविष्यात मोठी समस्या निर्माण करणाऱ्या या कचऱ्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता 'अंकुर' सामाजिक संस्थेमार्फत 'प्लास्टिमॅन' उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोळा केलेला प्लास्टिक कचरा शाळेत आणून द्यायचा आहे. 

पर्यावरणासाठी हानिकारक ठरलेल्या प्लास्टिकवर राज्य सरकारने गेल्या वर्षी बंदी लागू केली. शहरातही महापालिकेमार्फत ठिकठिकाणी जनजागृती व प्लास्टिकविरोधात मोहीम राबवली गेली; मात्र मोठ्यांकडून प्लास्टिकचा वापर काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून सजग करण्याचा प्रयत्न, अंकुर संस्थेमार्फत केला जाणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये हा उपक्रम सुरू करण्यापूर्वी तेथील विद्यार्थ्यांना 'प्लास्टिमॅन'ची ओळख त्यांच्या आवडीच्या सुपरमॅनप्रमाणे करून दिली जाईल. आपली पृथ्वी आणि निसर्गरक्षणासाठी प्लास्टिमॅनची का गरज आहे. हे सांगणारी चित्रफीतही दाखवली जाणार आहे. शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेतर्फेही या उपक्रमात अंकुर संस्थेला आवश्‍यक मदत केली जाणार आहे. 

प्लास्टिमॅन उपक्रमांतर्गत घरी जमा होणारा प्लास्टिकचा कचरा जसे चॉकलेट, बिस्किटचे रॅपर, सऑस्‌, शॅम्पूची पाकिटे, प्लास्टिकचे छोटे तुकडे विद्यार्थ्यांनी गोळा करून एका बाटलीत भरून शाळेत आणून द्यायचा आहे. तेथून संस्थेचे सदस्य जमा केलेले प्लास्टिक पुणे येथील रुद्र एन्व्हायरनमेंटल कंपनीकडे पुनर्प्रक्रियेसाठी देतील. 
- गीता देशपांडे, अंकुर सामाजिक संस्था 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plastiman in Navi mumbai