माझ्यावर हल्ला केलेल्या शिवसैनिकांना माफ करा - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

मुंबई - हल्ल्याच्या घटनेला 20 वर्षे झाली आहेत. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझे मनोमिलन झाले होते. त्यामुळे या प्रकरणातील शिवसैनिकांबाबत आपली कोणतीही तक्रार नसून त्यांना माफी द्यावी, अशी विनंती शनिवारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे केली. शिवसेना सोडल्यानंतर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शनिवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयात भुजबळ यांची साक्ष झाली, त्या वेळी त्यांनी ही विनंती केली.

अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर. के. देशपांडे यांच्यासमोर भुजबळांना हजर करण्यात आले होते. भुजबळ म्हणाले की, 1996 मध्ये राज्यात शिवसेना- भाजप युतीचे सरकार होते. विरोधी पक्षनेते म्हणून सरकारला धारेवर धरण्यात आले होते. त्या वेळी पुतळा विटंबनेबाबत शिवसेनेच्या "सामना' मुखपत्रातून छापून आलेल्या बातमीत करण्यात आलेल्या आरोपांबाबत ठाकरे, मुख्य संपादक व मुद्रक यांच्याविरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता; मात्र 2009 मध्ये बाळासाहेबांची प्रकृती पाहून मी दावा मागे घेतला होता. त्या वेळी कुटुंबीयांसोबत मी बाळासाहेबांची भेटही घेतली होती. या सर्व प्रकरणाला 20 वर्षांहून अधिक कालावधी झाला असून, इतर आरोपींबाबतही माझी कुठलीही तक्रार नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Please forgive me for Shivsainik