परदेशी विद्यार्थ्यांनी लुटला मातीतील खेळांचा आनंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

विक्रमगडमधील ओंदे शाळेतील क्रीडा स्पर्धांमध्ये उत्साही सहभाग

विक्रमगड ः मराठी मातीची ओढ भल्याभल्यांना मातीत उतरवण्यास भाग पाडते, मग ते भारतीय असोत वा परदेशी. असाच अनुभव विक्रमगड तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळा; ओंदे येथे पाहायला मिळाला. या मराठी शाळेत झालेल्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होत अमेरिकन स्कूल ऑफ चेन्नई या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आदिवासी विद्यार्थ्यांसोबत मराठमोळ्या खेळांचा आनंद लुटला.  दोरीउडी, खो-खो यांसह विविध प्रकारचे खेळ खेळण्यात ते रंगून गेले. या वेळी ओंदे जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी एकसुरातील कविता सादर करून त्यांचे मनोरंजनही केले. 

‘अमेरिकन स्कूल ऑफ चेन्नई’ या शाळेतील विद्यार्थी भारतीय ग्रामीण भागाच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी विक्रमगड तालुक्‍यात आले आहेत. या वेळी त्यांनी ओंदे जिल्हा परिषद केंद्रशाळेत जाऊन तेथील क्रीडा स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. या वेळी त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन खेळांची मजा लुटली. अमेरिकेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक विषय अभ्यासण्याची पद्धत, शिस्त आणि मोकळेपणा पाहून आदिवासी विद्यार्थीही त्यांच्याशी एकरूप झाले. 

या वेळी ओंदे गावातील विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमेरिकेतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास, शिस्त या गोष्टी पाहून ते भारावून गेले. या वेळी अमेरिकन स्कूल ऑफ चेन्नईतर्फे अमोल देशपांडे, शरद खोचरे, सागर कांबळे, परेश कोळी, जेसिका जे, लुका आदींसह ओंदे शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

अमेरिकन स्कूल ऑफ चेन्नई या शाळेतील अमेरिकन विद्यार्थ्यांनी आमच्या ओंदे जिल्हा परिषद केंद्रशाळेला भेट दिली. या वेळी त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांसोबत विविध क्रीडा स्पर्धांचा आनंद घेतला. अमेरिकेतील शिक्षणपद्धती, विद्यार्थ्यांमधील क्षमता, आत्मविश्‍वास, शिस्त, मोकळेपणातून आमच्या शाळेतील मुलांनाही चांगल्या गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे अमेरिकेतील विद्यार्थ्यांनीही येथील शिक्षणपद्धत आणि क्रीडाप्रकार जाणून घेतले.
अजित भोये, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद केंद्रशाळा, ओंदे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The pleasure of playing clay is robbed by foreign students in Vikramgad