Mumbai News : बीकेसीत भाजप, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi visit to mumbai bkc bjp balasahebanchi shiv sena politics mumbai

Mumbai News : बीकेसीत भाजप, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुंबईत दाखल झाले होते. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सरकारच्या काळातील कामांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत हजेरी लावली होती.

यावेळी भाजपच्या तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन पहायला मिळाले. मुंबईत मोदींच्या स्वागताच्या निमित्ताने स्वागताचे आणि धन्यवाद देण्याचे बॅनर झळकले होते. त्यासोबतच फेरीवाल्यांसाठीच्या योजनेच्या निमित्तानेही मुंबईच्या अनेक भागातून फेरीवाल्यांनीही या मैदानाच्या ठिकाणी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाच्या आधीच एक कमान कोसळल्याची किरकोळ घटनाही यावेळी घडली.

भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन

बेस्टच्या अनेक बसेसच्या माध्यमातून भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दाखल झाले. मुंबईतच्या उपनगरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या आलेल्या बसेसमुळे त्याचा परिणाम हा बेस्टच्या दैनंदिन बससेवेवरही झालेला पहायला मिळाला.

त्यासोबतच खासगी बसेसचा वापरही करून ठिकठिकाणाहून कार्यकर्ते या सभेच्या ठिकाणी दाखल झाले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी एक प्रकारे आजच्या सभेच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शानासाठी मोठी गर्दी केली होती. त्यासोबतच बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही या सभेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमवले होते.

फेरीवाल्यांसाठी विशेष व्यवस्था

पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत फेरीवाल्यांसाठीच्या कर्जाच्या वितरणाच्या योजनेचे पंतप्रधानांची कळ दाबून सुरूवात केली. या योजनेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांना सहभाग दाखवला आहे. सभेच्या ठिकाणीही फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

सभेच्या ठिकाणी फेरीवाल्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. फेीवाल्यांना वेगळे ब्लॉक ठेवत त्यांच्यासाठी बसण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या ठिकाणी पंतप्रधानांनी योजनेसाठी डीबीटी साठीची कळ दाबून योजनेला शुभारंभ केला.

धन्यवाद मोदीजींचे बॅनर झळकले

मुंबईतल्या विकासकामांसाठी तसेच फेरीवाल्यांसाठीच्या स्वनिधी योजनेसाठीचा शुभारंभ केल्याने अनेक कार्यकर्त्यांनी धन्यवाद मोदीजी असे बॅनर सभेच्या ठिकाणी आणले होते. विकासपुरूष मोदीजी म्हणून या बॅनरमध्ये मोदीजींचा गौरव करत त्यांचे धन्यवाद मानले होते. अनेक कार्यकर्त्यांनी मोदीजींचे आभार मानले.

मोदींना पाहण्यासाठी बघ्यांचीही गर्दी

एकीकडे शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी सभेच्या ठिकाणी मोठी हजेरी लावली होती. तर दुसरीकडे सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोदींना पाहण्यासाठी बघ्यांचीही गर्दी झाली होती. कार्यकर्त्यांसह अनेकजण फक्त मोदींना पाहण्यासाठीही हजर झाले होते. त्यामध्ये काही परदेशी नागरिकांनीही सहभाग दाखवला होता. दक्षिण कोरियातून मुंबई भेटीला आलेल्या पर्यटकांनीही सभेच्या ठिकाणी हजेरी लावली होती.

कमान कोसळली

सभेच्या ठिकाणी एका प्रवेशद्वाराजवळ कमान कोसळल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली होती. या घटनेमध्ये एका पोलीसही जखमी झाल्याची माहिती मिळाली. परंतु पोलिसाला किरकोळ जखम झाल्याची माहिती मिळाली. घटनेनंतर काही मिनिटांमध्येच ही कमान पूर्ववत करत बसवण्यात आली. एका गाडीवर कमानीचा काही भाग आदळल्याने त्याठिकाणी मोठे नुकसान टळले.