PMC bank fraud | विवा ग्रुपच्या व्यवस्थापकीय  संचालक, सल्लागारास अटक

अनिश पाटील
Saturday, 23 January 2021

पंजाब अँड महाराष्ट्र कॉ-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने शुक्रवारी पाच ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. 

मुंबई  ः विवा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक मेहुल ठाकूर आणि कंपनीचे सल्लागार मदन गोपाळ चतुर्वेदी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. पंजाब अँड महाराष्ट्र कॉ-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने शुक्रवारी पाच ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. 

विवा ग्रुपचे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (बविआ) उद्धव ठाकरे सरकारला पाठिंबा दिला आहे. बविआचे सध्या तीन आमदार आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या अटकेला दुजोरा दिला आहे. गुरू आशीष कन्स्ट्रक्‍शनचे प्रवीण राऊत यांनी केलेल्या कथित मनी लॉंडरिंगबद्दल दोन्ही आरोपींना पूर्ण माहिती होती. या वेळी शुक्रवारी राबवण्यात आलेल्या दोन शोधमोहिमेत 73 लाख रोख, डिजिटल व कागदोपत्री पुरावे जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी अंधेरी, जुहू व चेंबूरसह पाच ठिकाणी ईडीने शोधमोहीम राबवली. या शोधमोहिमेसाठी 30 सीआरपीएफ कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या दोनही आरोपींना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. प्राथमिक तपासात पीएमसी बॅंक गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी एचडीआयएलचे वाधवान यांनी दोन मालमत्ता 34 कोटी रुपयांना विवा ग्रुपला दिल्या होत्या. त्यासाठी 2017 ला ऍग्रिमेंट करण्यात आले होते. हा व्यवहार 37 धनादेशांमार्फत झाल्याचे दाखवण्यात आले होते; पण हे धनादेश वटवण्यात आले नसल्याचा ईडीला संशय आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यसाठी येथे क्लिक करा

पीएमसी बॅंकेतील 4,355 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एचडीआयएलचे राकेश वाधवान, सारंग वाधवान, वारियम सिंग, जॉय थॉमस आणि इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गैरव्यवहारातील 95 कोटी एचडीआयएलमार्फत प्रवीण राऊत याने इतर ठिकाणी वळते केल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या व्यवहाराची कोणतीही कागदपत्रे करण्यात आली नाहीत. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, रकमेच्या माध्यमातून पालघर येथे जमीन घेण्यात आली होती. याशिवाय गैरव्यवहारातील एक कोटी 60 लाख प्रवीणने त्याची पत्नी माधुरी राऊतला दिले होते. त्यातील 55 लाख रुपये (23 डिसेंबर 2010 ला 50 लाख व 15 मार्च 2011 ला पाच लाख रुपये) विनाव्याजी कर्ज म्हणून शिवसेने नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना देण्यात आले होते. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. 

PMC Bank scam Viva Group Administrator Driver, Consultant  Arrested

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC Bank scam Viva Group Administrator Driver, Consultant Arrested