पीएमसी गैरव्यवहार : रणजित सिंगच्या घराची झाडाझडती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

25 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी 

मुंबई : भाजप माजी आमदार सरदार तारा सिंग यांचा सुपुत्र रणजीत सिंग याला "पीएमसी' बॅंकेतील 4,355 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अटक केल्यानंतर रविवारी (ता. 16) त्याच्या शीव कोळीवाडा येथील "कर्मक्षेत्र' इमारतीतील निवासस्थानी शोधमोहीम राबवण्यात आली. दरम्यान, न्यायालयाने रणजीत याला 25 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
रणजीत याच्या निवासस्थानी सुमारे एक तास चाललेल्या या शोधमोहिमेत आर्थिक गुन्हे शाखेचे चार अधिकारी सहभागी झाले होते. गैरव्यवहारप्रकरणी पुरावे गोळा करण्याच्या उद्देशाने ही शोधमोहीम राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या अटकेमुळे पीएमसी प्रकरणातील अटक आरोपींची संख्या नऊवर पोहोचली आहे. यापूर्वी याप्रकरणी एचडीआयएलचे राकेश वाधवान व सारंग वाधवान, पीएमसीचा माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, माजी संचालक वरियम सिंग, सुरजित सिंग अरोरा आणि तीन लेखापरीक्षकांना अटक झाली होती. आरबीआयने पीएमसी बॅंकेवर निर्बंध घातल्यापासून आतापर्यंत बॅंकेच्या 10 खातेधारकांचा मृत्यू झाला आहे. 
आरबीआयने नेमलेल्या प्रशासकाने याप्रकरणी 4,355 कोटींचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. बॅंकेच्या व्यवस्थापनातील थॉमस याच्या जबाबाच्या आधारे वित्त कर्ज देताना काही अनियमितता असल्याचे निष्पन्न झाले होते. ही अनियमितता 2008 नंतर दिसून आल्यामुळे तेव्हापासूनचे पुरावे गोळा करण्याचे मोठे आव्हान "ईओडब्ल्यू'पुढे आहे. विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC scam : Search operation at accused Ranjit Singh`s Residence