जानकरांवर निवडणूक आयोगाचे ताशेरे

जानकरांवर निवडणूक आयोगाचे ताशेरे

मुंबई - वडसा देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत उमेदवार मोटवानी यांच्या निवडणूक चिन्हासाठी दबाव आणण्याचा आरोप पशू व दुग्धसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्यावर होत असतानाच निवडणूक आयोगाने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. जानकर यांनी निवडणूक निर्णयप्रक्रियेत दबाव आणल्याचा प्रयत्न केला असल्याने त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे पत्र गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.

पालिका निवडणुकीत मोटवानी यांना अमूक निवडणूक चिन्ह द्या, अशी मागणी करणे लोकहिताचे कसे, असा प्रश्‍न निवडणूक आयोगाने या संदर्भात सादर केलेल्या अहवालात केला आहे. कॅबिनेट मंत्रिपद सांभाळणाऱ्या एका व्यक्‍तीने असा दबाव आणणे अयोग्य असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात का येऊ नये, असा सवालही निवडणूक आयोगाचे प्रमुख ज. स. सहारिया यांनी केला आहे. जानकर यांच्या कथित हस्तक्षेपाबद्दल खुलासा मागवण्यात आला होता. त्यावर जानकर यांच्या खुलाशामुळे आयोगाचे समाधान झालेले नाही. खुलाशात जानकर यांनी म्हटले, की सार्वजनिक कामासाठी मी वडसा देसाईगंज येथे गेलो असताना मोटवानी मला भेटावयास आले. कॉंग्रेस आपल्यावर दबाव आणत असल्याने मला संरक्षण द्यावे. मला त्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढायची नसून मला अपक्ष म्हणून कपबशी चिन्हावर निवडणूक लढायची असल्याचे त्यांनी मला सांगितले.

कॉंग्रेस पक्ष या संदर्भात माझ्यावर दबाव आणत असल्याने मला संरक्षण द्यावे, अशी विनंती मोटवानी यांनी केली. त्यांचे हे संरक्षण मागणे लोकहिताचे असल्याने मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला तसा दूरध्वनी केल्याचे जानकर यांनी खुलाशात नमूद केले आहे. आपण आचारसंहितेचा भंग केलेला नाही, तर एका इसमास संरक्षण दिले, असेही या पत्रात त्यांनी नमूद केले आहे. या संभाषणाचे रेकॉर्डिंग सार्वजनिकरीत्या दाखवले जाणे दुर्दैवी, हेतुपुरस्सर होते, असेही जानकरांनी नमूद केले आहे. प्रत्यक्षात मोटवानी यांनी कॉंग्रेसकडून अर्ज दाखल केला होता, त्यांची सून या प्रक्रियेत उमेदवार होती. एकदा एका पक्षाकडून अर्ज भरला गेल्यानंतर असा दबाव आणणे योग्य नव्हते, असे आता आयोगाने नमूद केले आहे. कॉंग्रेस नेते राजेश शर्मा यांनी याबद्दल केलेली तक्रार ग्राह्य मानण्यात यावी, असे गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी आयोगाला कळवले होते. त्या आधारावर आयोगाने कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com