मित्रांचे प्राण वाचवताना तरुण बुडाला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

राजेंद्र हे तरुण शनिवारी दुपारी मुंबईतील 16 मित्रांना घेऊन कुडपण येथे आले होते. पावसाचाही सर्वत्र जोर होता. अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती झाली होती. सर्व पर्यटक सायंकाळी जगबुडी नदीत पोहण्यासाठी पाण्याच्या दिशेने गेले.

मित्रांचे प्राण वाचवताना तरुण बुडाला
मुंबई ः पाोलादपूर तालुक्‍यात पूरसदृश स्थिती निर्माण झालेली असताना मुंबईतून पर्यटनासाठी आलेल्या 16 पर्यटक मित्रांना वाचविण्यासाठी गेलेल्या राजेंद्र शेलार (वय 26, सध्या रा. मुंबई, मूळ रहिवासी कुडपण) यांचा जगबुडी नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. 27) कुडपण येथे घडली. शेलार हे मुंबईतील पर्यटकांना आपल्या कुडपण या गावी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटनासाठी घेऊन येतात; मात्र शनिवारी त्यांच्यावर काळाने घाला घातला.

राजेंद्र हे तरुण शनिवारी दुपारी मुंबईतील 16 मित्रांना घेऊन कुडपण येथे आले होते. पावसाचाही सर्वत्र जोर होता. अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती झाली होती. सर्व पर्यटक सायंकाळी जगबुडी नदीत पोहण्यासाठी पाण्याच्या दिशेने गेले. या वेळी अचानक पाणी वाढले. यात पर्यटक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत होते. त्यांना वाचवण्यासाठी राजेंद्र पुढे गेले असता पाय घसरून नदीत पडले. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने काही अंतरावर वाहत जात कुडपण बुद्रुक गावाकडे जाणाऱ्या जगबुडी नदीच्या पुलाखाली एका दगडाला जाऊन अडकले; मात्र पाण्याच्या प्रवाहात आपटत गेल्याने त्यांचा नदीतच मृत्यू झाला. या घटनेने कुडपणसह पोलादपूरमध्ये शोककळा पसरली.

या घटनेची माहिती मिळताच रात्री 10 वाजता पोलादपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जाधव, सहायक फौजदार प्रकाश जंगम, पोलिस हवालदार पवार, पी. एन. वार्डे, आशीष नटे, इकबाल शेख, नायब तहसीलदार समीर देसाई, कर्मचारी अशोक सुसलादे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कर्तव्य, सिस्केप या गिर्यारोहक संस्थांनी साहित्य घेऊन घटनास्थळी जाऊन रात्री 10 ते 1 वाजेपर्यंत तीन तास शोध मोहीम राबविल्यानंतर जगबुडी पुलाजवळ मृतदेह सापडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: poladpur issue

फोटो गॅलरी