लुटीचा कट फसल्याने हत्या

लुटीचा कट फसल्याने हत्या
लुटीचा कट फसल्याने हत्या

मुंबई : कॉटन ग्रीन परिसरात २४ नोव्हेंबर रोजी एकाची हत्या करून उत्तर प्रदेशात पळून गेलेल्या आरोपीला काळाचौकी पोलिसांनी अटक केली. आरोपींनी वेश्‍या व्यवसायातील दलालाची लुटीच्या उद्देशाने १३ वार करून निर्घृणपणे हत्या केली होती. पोलिसांनी ९ दिवसांत या प्रकरणाचा छडा लावत आरोपी रवी आनंद (३०), रितिक सुनेरिया (१९) यांना अटक केली. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मृत व्यक्तीला लुटण्याचा कट आरोपींची रचला होता; पण तो यशस्वी न झाल्यामुळे हत्या करण्यात आल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली.  कॉटन ग्रीन परिसरात २४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एक अनोळखी व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती काळाचौकी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला केईएम रुग्णालयात दाखल केले; मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी इंटरनेट, सामाजिक माध्यमे, प्रसिद्धी पत्रके, बिनतारी संदेश आदींचा उपयोग केला. त्या वेळी हा मृतदेह शामदेव ईश्‍वर यादव (२९) याचा असल्याचे समजले.

प्रकरणातील आरोपी उत्तर प्रदेशातील झाशी येथे पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी झाशीत जाऊन आरोपींना बेड्या ठोकल्या. तसेच, याप्रकरणी आरोपींना पुरावा नष्ट करण्याकरिता मदत करणारे सुंदरराज दुरायास्वामी शेट्टी (४६) अणि अभया लीलाधर गौतम (४५) यांनादेखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी एका आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सीसी टीव्ही फुटेजवरून शोध
मृत ईश्वर यादव हा चेंबूरमध्ये राहत होता. तसेच तो लॅमिण्टन रोड परिसरात वेश्‍या व्यवसायात दलाल म्हणून कार्यरत होता. घटनास्थळ तसेच त्याजवळील रस्त्यावरील ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर पोलिसांना आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाची ओळख पटली. त्याआधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर गुप्त बातमीदारांच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com