गृहनिर्माण सोसायट्यांनी सामंजस्याने समस्या सोडवाव्यात 

गृहनिर्माण सोसायट्यांनी सामंजस्याने समस्या सोडवाव्यात 

नवी मुंबई  - पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये गृहनिर्माण सोसायटीमधील वादाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी असे वाद, समस्या सामंजस्याने सोडवाव्यात, असा सल्ला पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी दिला. 

महाराष्ट्र पोलिस रेझींग डेनिमित्त पोलिस आयुक्तालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने सीबीडीतील पोलिस आयुक्तालयाच्या प्रांगणात शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी-प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सहआयुक्त डॉ. सुरेश कुमार मेकला, परिमंडळ-एकचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे, गुन्हे शाखेचे उपआयुक्त तुषार दोशी, वाहतूक शाखेचे पोलिस सुनील लोखंडे उपस्थित होते. 

पोलिस आयुक्तालय अंतर्गत शाळा-कॉलेज, संवेदनशील ठिकाणे, जास्त गर्दीची ठिकाणे यांसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी विविध वेळांमध्ये पेट्रोलिंग करावी लागते. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांतर्गत विशेषत: रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी (पेट्रोलिंग) मनुष्यबळ खूपच अपुरे असल्याने मर्यादा येत आहेत. आज अवघे 160 पोलिस कर्मचारी आणि 10-12 पोलिस अधिकारी पेट्रोलिंग तेही ड्युटीनुसार करत असतात. त्यामुळे पेट्रोलिंगसाठी नवी मुंबई पोलिसांना मदत करण्यासाठी पोलिस मित्र अथवा कार्यकर्त्यांनी पुढे येण्याचे आवाहन या वेळी पोलिस आयुक्तांनी केले. सोसायटी अथवा मुख्य रस्ते, वर्दळीच्या ठिकाणी लावण्यात आलेले सीसी टीव्ही कॅमेरे त्यातील चित्रण (लीड) देतात. आरोपी पकडून देत नाही. सीसी टीव्हीतील चित्रण पोलिसांना तपासासाठी एक मदत म्हणून काम करते, असे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

दरम्यान, महाराष्ट्र पोलिस रेझींग डे निमित्त नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांतर्गत विविध शाळा आणि कॉलेजमधील सुमारे एक हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना सीसीटीएनएस संगणक प्रणाली, वाहतुकीच्या नियमांचे पालन, सायबर गुन्ह्यांबाबत घ्यावयाची काळजी, घटनास्थळी पुरावे कसे गोळा करावेत, शस्त्र-दारुगोळा, श्वान पथक, बॉम्बशोधक-नाशक पथक, इन्व्हेस्टिगेशन व्हॅन, सीसी टीव्ही कमांड कंट्रोलचे कार्य, दंगल नियंत्रण पथक, सागरी सुरक्षा आणि जलद प्रतिसाद पथक (क्विक रिस्पॉन्स टीम) यांचे कार्य; तसेच बिनतारी संदेश यंत्रणाबाबतची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आल्याचे पोलिस उपआयुक्त तुषार दोशी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com