सिरीयल रेपिस्टला 6 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

नवी मुंबई - मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींसोबत अश्‍लील चाळे करून पलायन करणाऱ्या सिरीयल रेपिस्टला सीसी टीव्ही फुटेजमुळेच अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांनी यश आले आहे. रेहान अब्दुल राशिद कुरेशी असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीला वाशी न्यायालयाने 6 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. 

नवी मुंबई - मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींसोबत अश्‍लील चाळे करून पलायन करणाऱ्या सिरीयल रेपिस्टला सीसी टीव्ही फुटेजमुळेच अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांनी यश आले आहे. रेहान अब्दुल राशिद कुरेशी असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीला वाशी न्यायालयाने 6 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. 

मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतील कोपरखैरणे, एपीएमसी, रबाळे, नेरूळ अशा विविध ठिकाणी अल्पवयीन व शाळेत जाणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण व अत्याचार केल्यानंतर या आरोपीने नवी मुंबईतून पलायन केले होता. दरम्यान, कुरेशीने नालासोपारा भागातील तुळींज परिसरात आणखी एका चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याचा प्रकार घडल्यामुळे पोलिसांच्या तपासाला गती मिळाली. 2017 ला कोपरखैरणे येथे एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून गायब झाल्यानंतर कुरेशीने 2018 मध्ये नालासोपारा येथे पुन्हा हा प्रकार केला. पोलिसांनी पनवेल ते सीएसटी रेल्वेस्थानकादरम्यान सर्व फलाटांवरील सीसी टीव्ही फुटेज तपासली. त्यानंतर पुन्हा त्याचा माग शोधण्यासाठी मध्य व पश्‍चिम रेल्वे मार्गावरच्या स्थानकांवरील सीसी टीव्ही फुटेजची मदत घेतली. कुरेशीच्या शोधासाठी पोलिसांनी सुमारे 500 मिनिटांचे सीसी टीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी कुरेशी जास्तवेळा मिरा रोड रेल्वेस्थानकात उतरताना आढळला. त्याचवेळी त्याला ओळखणाऱ्या गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक योगेश वाघमारे व सहायक पोलिस निरीक्षक राहुल राख यांच्या पथकांना मिरा रोडच्या दिशेने रवाना केले. नवी मुंबई पोलिसांना मिरा रोड पोलिसांचीही मदत मिळाली. संध्याकाळच्या सुमारास कुरेशी एस-9 बारच्या परिसरात रस्त्यावर चहा घ्यायला आला होता. त्यावेळी नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकांनी त्याला अटक केली. 

नवी मुंबईत 15 पैकी 7 गुन्हे 
रेहान कुरेशी या आरोपीने नवी मुंबईत 2015 ला तळोजामध्ये एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने 2017 ला रबाळे-2 व एपीएमसी-2, 2018 ला कोपरखैरणे व नेरूळमध्ये प्रत्येकी एक असे सहा गुन्हे केले आहेत. 

- 15 पोलिस अधिकारी, खंडणीविरोधी पथक, गुन्हे शाखा असे एकूण 75 पोलिस कर्मचारी आरोपीच्या मार्गावर होते. 
- 2015 ला तळोजातील ओवे गावात राहत होता. 
- तेव्हा गावातील मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्यामुळे अटकेत होता. 
- कुरेशीच्या घरातून पोलिसांना एक लॅपटॉप मिळाला. 

चालण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे आरोपी फसला 
कुरेशी हा मोबाईलचा वापर करीत नव्हता. तसेच मुलींसोबत लैंगिक चाळे करताना तो मोबाईलचा वापर टाळायचा. त्यामुळे पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचता येत नव्हते. तसेच एखादा गुन्हा केला, की कुरेशी कधी दाढी वाढवायचा, दाढी कमी करायचा त्यामुळे त्याला ओळखता येत नव्हते. तसेच कुरेशीची चालण्याची वेगळी पद्धत होती. एका बाजूचा हात स्थिर करून दुसरा खांदा झुकवून जास्त हात हलवण्याच्या त्याच्या पद्धतीमुळे तो पोलिसांच्या नजरेत बसला होता. त्याच्या चालण्यामुळे तो मिरा रोड परिसरात वावरताना दिसला; तेव्हा त्याला तत्काळ ओळखता आले. 

दोन वर्षांपासून नवी मुंबईसह इतर पोलिस या विकृताच्या मागावर होते. पोलिसांनी त्याचे सीसी टीव्ही फोटो प्रसिद्ध केले होते; मात्र नागरिकांमध्ये जागरुकतेचा अभाव असल्यामुळे पोलिसांना त्याची फारशी मदत झाली नाही. 
- संजीव कुमार, पोलिस आयुक्त 

Web Title: Police custody till serial repost till 6th October