पोलिसांची घरे धोक्‍याची

तेजस वाघमारे : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र राबणाऱ्या पोलिसांना धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. वरळीतील पोलिस वसाहतीची दुरवस्था झाली असून, पोलिसांना कुटुंबीयांसह जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. घरातील छत कोसळण्याच्या घटनांचे सत्र सुरूच असून, त्याबाबत पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे.

शहर आणि उपनगरात विविध ठिकाणच्या ठाण्यांमध्ये कार्यरत असलेले पोलिस कुटुंबीयांसह वरळीतील कॅम्पमध्ये राहतात. कॅम्पमधील इमारती जुन्या झाल्या असून, त्यांची वारंवार बाहेरून डागडुजी करण्यात आली आहे. इमारतीच्या आतील बाजूची पार दुरवस्था झाली आहे. काही इमारतींच्या पिलरला तडे गेले आहेत. खोल्यांतील प्लास्टर वारंवार कोसळत असल्याने पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करून घरातील प्लास्टरची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यानंतरही बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने पोलिसांना धोकादायक घरांमध्येच राहावे लागत आहे. स्वयंपाकघरातील स्लॅबचे प्लास्टर सतत कोसळत असल्याने जेवण करणेही गृहिणींना अवघड झाले आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्‍यात आले असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

ऑडिटसाठी  निधीच नाही
बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने पोलिसांनी आता स्थानिक आमदार सुनील शिंदे आणि नगरसेवक आशीष चेंबूरकर यांना साकडे घातले आहे. गृह विभागाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने इमारतींची डागडुजी रखडली आहे. युवा सेना उपविभाग प्रमुख अभिजित पाटील यांनी गृह विभागाकडे याबाबत विचारणा केली असता, विभागाकडून इमारतींचे ऑडिट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ऑडिटसाठी बांधकाम विभागाकडे निधीच नसल्याने तो येईपर्यंत आणि ऑडिट होईपर्यंत बराच कालावधी लागू शकतो. त्यामुळे गृहनिर्माण विभागाने तातडीने निधी देऊन इमारतींची डागडुजी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Web Title: Police danger houses