पोलिसांनाही हेल्मेट सक्तीचे!    

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

नवी मुंबई - दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी सर्वसामान्यांची पावती फाडणाऱ्या पोलिसांनाही आता या गुन्ह्यांसाठी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या संदर्भात नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी आज आदेश काढले आहेत.

दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जनजागृतीपर कार्यक्रम केले. परंतु, ही जनजागृती फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे, आपल्यासाठी नाही असे समजून काही पोलिस कर्मचारी दुचाकी चालवताना हेल्मेट घालत नाहीत. त्यामुळे अपघातात पोलिसांनाही जीव गमवावा लागला आहे. हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

हेल्मेट नसल्यामुळे पाच वेळा पोलिसांनी माझी पावती फाडली आहे; पण शहरात अनेक वेळा पोलिसच विनाहेल्मेट प्रवास करताना दिसतात. त्यामुळे कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्यांकडून तो मोडला जात असेल, तर सर्वसामान्यांवरच ही सक्ती का? असा प्रश्‍न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे.
- प्रवीण कुटार, नागरिक

विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर विभागाकडून सातत्याने कारवाई केली जाते. पोलिसांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी व नियमांचे पालन करण्यासाठी दुचाकी चालविताना हेल्मेट घालूनच प्रवास करणे अपेक्षित आहे. म्हणूनच वाहतूक विभागाच्या पोलिसांना ७५० हेल्मेट दिले आहेत. 
- सुनील लोखंडे, उपायुक्त पोलिस, वाहतूक विभाग, नवी मुंबई

Web Title: Police helmet is compulsory