ठाण्यात पोलिसांचे भरघोस मतदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

जिल्ह्यातील ९३ टक्के कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्याची चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे बंदोबस्तात व्यस्त असतानाही पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मतदानाचा हक्क बजावल्याचे समोर आले आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयात नऊ हजार २१२ पोलिस असून त्यापैकी आठ हजार ५६३ पोलिसांनी मतदानाचा आपला हक्क बजावला. त्यामुळे जेमतेम ४९ टक्के मतदान झाले असतानाही ठाण्यात मात्र केवळ पोलिसांचेच ९३ टक्के मतदान झाल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.

ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आयुक्तालयातील सर्व पोलिसांना पोस्टल मतपत्रिका उपलब्ध करून दिल्यामुळे बंदोबस्तातही पोलिसांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला. टपाली मतदानाची प्रक्रिया ही किचकट असते. यासंदर्भात पोलिस आयुक्तालयात ही प्रक्रिया माहिती होण्यासाठी टपाली मतपत्रिकेचे प्रशिक्षणही देण्यात आले.

ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट अशा पाचही परिमंडळांतील ३५ पोलिस ठाणे आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्व युनिटमध्ये टपाली मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी टपाली मतदान कक्षही स्थापन करण्यात आला होता.

या कक्षाकडे पाठपुरावा करण्यासाठी मुख्यालयातील पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्तांच्या पातळीवर टपाली मतदान कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. पोलिसांना मतदार यादीतील नाव आणि अनुक्रमांक या माहितीची पडताळणी करून घेण्यासाठी अर्जही पाठवण्यात आले होते.

मतदान न करणाऱ्यांसमोर आदर्श
मतदार यादीत नाव असलेल्या कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिका मिळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे १२ क्रमांकाचा अर्जही भरून पाठवला होता. टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्यानंतर ती भरून पुन्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यासाठी फारच थोडा वेळ असल्याने पाठपुरावादेखील करण्यात आला. तेव्हा पोलिस आयुक्तांमुळे पोलिस बंदोबस्तामध्ये व्यस्त असतानाही इतक्‍या मोठ्या प्रमाणावर प्रथमच टपाली मतदानाद्वारे मतदान करून मतदान न करणाऱ्यांसमोर पोलिसांनी एक आदर्श निर्माण केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Maximum polls in Thane