एक पोलिस अधिकारी बडतर्फ; चार जण निलंबित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

आमदार रमेश कदम रोकड जप्त प्रकरण

ठाणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आमदार रमेश कदम यांच्या मित्राजवळ सापडलेल्या ५३ लाखांच्या रोकडमुळे पाच पोलिसांना नोकरी गमवावी लागली आहे. या प्रकरणी, ठाणे पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक रोहिदास पवार यांना सेवेतून बडतर्फ, तर त्यांच्या पथकातील चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली.

सोलापूर येथील मोहोळ मतदारसंघातील आमदार आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेल्या रमेश कदम यांना खासगी वाहनाने ठाण्यातील त्यांचा मित्र राजू खरे यांच्या घरी नेल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सोलापूर येथील मोहोळ मतदारसंघातील आमदार रमेश कदम यांना काही वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

शुक्रवारी त्यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले होते. त्यांच्यासोबत ठाणे शहर पोलिस दलातील उपनिरीक्षक रोहिदास पवार, पोलिस कॉन्स्टेबल दिलीप चव्हाण, दत्तू खेताडे, उत्तम कांबळे आणि विकास गायकवाड होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर रमेश कदम यांना पुन्हा ठाणे तुरुंगात आणणे गरजेचे होते. मात्र रमेश कदम यांच्या सांगण्यावरून रोहिदास यांनी त्यांना खासगी कारने राजू खरे यांच्या घरी नेले.

याची माहिती परिमंडळ पाचचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने राजू खरे यांच्या घराची झडती घेतली. त्या वेळी पोलिसांनी ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोकड मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A police officer resticate ; Four people suspended