पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

मुंबई- मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरे परिसरातील निर्जनस्थळी अथर्वचा मृतदेह सापडला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्याचा मित्रांसोबत वाद झाल्याचे समोर आले असून, पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. 

अथर्व शिंदे (20) असे मृत तरुणाचे नाव आहे. मुंबई पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या नरेंद्र शिंदे यांचा अथर्व हा मुलगा आहे. अथर्व त्याच्या कुटुंबीयांसह गोरेगाव पूर्व येथील रॉयल पाम येथे राहत होता. संगीत आणि फिल्म संबंधित साऊंड इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर अथर्व नोकरीच्या शोधात होता. अशातच रविवारी त्याच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने तो मित्रांसह या परिसरातील विला या बंगल्यात गेला होता. वाढदिवस असल्याने तिकडे जात असल्याचे त्याने घरातून बाहेर पडताना सांगितले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत अथर्व घरी न आल्याने, तसेच त्याचा मोबाईलही बंद असल्याने पालकांनी त्याच्या मित्रांना विचारणा केली. मात्र वाढदिवस झाल्यानंतर तो घरी गेल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे त्याचा शोध घेण्यास कुटुंबाने सुरुवात केली. मात्र खूप शोधाशोध करूनही तो मिळाला नाही. 

बुधवारी आरे परिसरात एक बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास केल्यानंतर हा मृतदेह अथर्वचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या मानेवर काही खुणा असून, तोंडातून रक्‍त आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने त्याची हत्या झाली असावी, असा पोलिसांना संशय आहे. अथर्वचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, अथर्वला शेवटी पाहणारा एक प्रत्यक्षदर्शी पोलिसांना मिळाला असून, त्याने आरे परिसरातून अथर्वला धावताना पाहिल्याचा दावा केला आहे. याबाबत पोलिस अधिक माहिती घेत आहेत. 

Web Title: Police officer son murdered