नियम न पाळल्याबद्दल पोलिस अधिकारी निलंबित

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 जून 2019

आधुनिक तंत्रज्ञान वापरणार
नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी राज्य सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणार असून, दीर्घकाळ हवेत राहणाऱ्या ड्रोनचा वापर त्यासाठी केला जाणार आहे. संरक्षण संशोधन विकास संस्थेने तयार केलेले रोबोट तंत्रज्ञानाचा वापरही यासाठी केला जाणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली. २०१८ मध्ये ५० नक्षलवादी पोलिस कारवाईत ठार झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबई  - महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्‍यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे यांना निलंबित करीत असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत केली. सुरक्षेचे नियम पाळले गेले नसल्याचा ठपका त्यांच्यावर चौकशी अहवालात ठेवण्यात आला होता. 

एक मे रोजी नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात कुरखेडा येथे १५ पोलिस हुतात्मा झाले होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये, धनंजय मुंडे, हेमंत टकले यांनी लक्षवेधी सूचना मांडली. कुरखेडा प्रकरणाचा सखोल चौकशी अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाल्याची माहिती केसरकर यांनी या विषयावर चर्चेला उत्तर देताना सुरवातीलाच दिली होती. या अहवालावर येत्या दोन दिवसांत निर्णय होईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगितले. या अहवालानुसार कुरखेडा येथून जाताना ‘प्रमाणित कार्यान्वित पद्धत’ (एसओपी) नुसार बटालियन जात नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी सभागृहासमोर ठेवली. तसेच, ‘एसओपी’चे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कडक करण्याविषयी सभागृहाला आश्वसित केले. मात्र, त्यांच्या उत्तरावर समाधान न झालेल्या विरोधकांनी अहवालावर ताबडतोब कारवाई करून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी लावून धरली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शैलेश काळे यांच्यावर ताबडतोब कारवाईची मागणी केली. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर काळे यांना ताबडतोब निलंबनाचे आदेश केसरकरांनी दिले. तसेच या नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या वारसदाराला अर्ज केल्यानंतर सात दिवसांच्या आत नोकरी दिली जाईल, असेही केसरकरांनी आश्वस्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Officer Suspend by Deepak Kesarkar