एटीएस-पोलिसांत वादाची ठिणगी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

मुंबई पोलिस आणि दहशवाद विरोधी पथकात (एटीएस) बदल्यांवरून शीतयुद्ध सुरू असताना सोमवारी मुंबई पोलिस दलातील आठ कर्तबगार अधिकाऱ्यांची एटीएसमध्ये बदली करण्यात आली. वरिष्ठांना डावलून एटीएसमध्ये बदलीची इच्छा दर्शविणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी नुकतीच कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

मुंबई - मुंबई पोलिस आणि दहशवाद विरोधी पथकात (एटीएस) बदल्यांवरून शीतयुद्ध सुरू असताना सोमवारी मुंबई पोलिस दलातील आठ कर्तबगार अधिकाऱ्यांची एटीएसमध्ये बदली करण्यात आली. वरिष्ठांना डावलून एटीएसमध्ये बदलीची इच्छा दर्शविणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी नुकतीच कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

देवेन भारती यांनी महिन्यापूर्वी एटीएसचे प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंबई पोलिस दलातील 12 अधिकाऱ्यांनी भारती यांच्यासोबत काम करण्यास मिळावे, यासाठी पोलिस आयुक्त बर्वे यांना डावलून थेट महासंचालकांकडे अर्ज केला. त्यावर अशा पद्धतीने अर्ज करणे मुंबई पोलिसांच्या शिस्तीला धरून नसल्याचा ठपका ठेवत बर्वे यांनी 12 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली. यामुळे पोलिस दलातील वाद चव्हाट्यावर आला.

एटीएसने मागील काही वर्षांत अनेक गंभीर प्रकरणे हाताळली. त्यातील काही गुन्ह्यांची उकल अद्याप झालेली नाही. नियुक्ती करण्यात आलेल्या याच अधिकाऱ्यांनी एकेकाळी गुन्हे शाखेत कार्यरत असताना गुन्हेगारांवर वचक ठेवला होता. मुंबईत आतापर्यंत महत्त्वाच्या अनेक गुन्ह्यांचा तपास या 12 अधिकाऱ्यांनी करीत आरोपींना तुरुंगात डांबले.

त्या पार्श्‍वभूमीवरच आठ अधिकाऱ्यांची विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी एटीएस पथकात बदली केल्याचे नियुक्तिपत्रात म्हटले आहे. यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन अलकनुरे, दिनेश कदम, नंदकुमार गोपाळे, ज्ञानेश्‍वर वाघ, सुधीर दळवी, राजेश भुयार, उमाकांत अडकी, संतोष भालेकर यांची नावे आहेत.

बर्वेंच्या भूमिकेकडे लक्ष
राजेश प्रधान यांनी दिलेल्या नियुक्तिपत्रांची मुंबई पोलिसांत जोरदार चर्चा सुरू आहे. आयुक्तांच्या नोटिशीला न जुमानता पोलिस महासंचालकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. नियुक्तीच्या पत्रांनंतर संजय बर्वे काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Officers Transfer to ATS