पोलिसांच्या परवानगीशिवाय रस्ते दुरुस्ती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई - शहरातील रस्ते दुरुस्ती करण्यासाठी महापालिका आता वाहतूक पोलिसांची परवानगी घेणार नाही. मुंबईतील दादर टीटी जंक्‍शन, गांधी मार्केट यांसह अनेक महत्त्वाच्या जंक्‍शनच्या आणि रस्त्यांची दुरुस्ती पोलिसांच्या परवानगीअभावी रखडली आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्‍यक असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. 

मुंबई - शहरातील रस्ते दुरुस्ती करण्यासाठी महापालिका आता वाहतूक पोलिसांची परवानगी घेणार नाही. मुंबईतील दादर टीटी जंक्‍शन, गांधी मार्केट यांसह अनेक महत्त्वाच्या जंक्‍शनच्या आणि रस्त्यांची दुरुस्ती पोलिसांच्या परवानगीअभावी रखडली आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्‍यक असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. 

मुंबईतील 185 रस्त्यांच्या आणि जंक्‍शनच्या दुरुस्तीची परवानगी वाहतूक पोलिसांनी नाकारली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्यापूर्वी आतापर्यंत पालिका वाहतूक पोलिसांची परवानगी घेत होती. रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडी होऊन त्याचा ताण वाढत असल्याने वाहतूक पोलिस अनेकदा परवानगी देण्यास टाळाटाळ करतात. याबाबत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी वेळोवेळी परवानगी मिळण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती; मात्र तरीही परवानगी मिळत नसल्याने पालिकेने आता परवानगी न घेता फक्त पूर्वकल्पना देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्रच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सहपोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांना पाठवले आहे. 

जंक्‍शनचे भुपृष्टीकरण करण्यात येणार असून, ही कामे रात्रीच्या वेळेत होतील; तसेच जास्तीत जास्त 10 दिवसांत ही कामे पूर्ण होतील, असे या पत्रात नमूद केले आहे. महापालिका कायदा कलम 289 (3) मुंबईतील रस्ते पूर्णत: अथवा अंशत: बंद करण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत. त्यानुसार पालिकेने हा निर्णय घेतला आहे. 

न्यायालयाचा दट्या पडेल 
पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांबाबत न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. त्यानुसार रस्ते दुरुस्तीचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ही कामे वेळेत पूर्ण झाली नाही, तर न्यायालयातून पालिकेला दट्या पडू शकतो. त्यामुळे पोलिसांच्या परवानगीसाठी न थांबण्याचा निर्णय पालिकेने घेतला असल्याचे समजते. 

या जंक्‍शन रस्त्यांच्या दुरुस्तीची परवानगी नाकारली 
- पूर्व उपनगर - 73 
- पश्‍चिम उपनगर - 91 
- दक्षिण मुंबई - 21 

Web Title: Police permission to repair roads