देहविक्री करणाऱ्या २८० महिलांची सुटका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मे 2019

 ग्रॅण्ट रोड परिसरातील काही इमारतींमध्ये शुक्रवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी देह विक्री करणाऱ्या तब्बल २८० हून अधिक महिलांची सुटका केली.

मुंबई -  ग्रॅण्ट रोड परिसरातील काही इमारतींमध्ये शुक्रवारी रात्री छापा टाकून पोलिसांनी देह विक्री करणाऱ्या तब्बल २८० हून अधिक महिलांची सुटका केली. तसेच याप्रकरणी डझनभर दलालांची धरपकड करण्यात आली असून, या छाप्यांमध्ये पोलिसांनी १० लाखांहून अधिक रोख रक्कम हस्तगत केल्याचे सांगितले.

मुंबईतील डान्स बारविरोधी कारवाईनंतर पोलिसांनी आता आपला मोर्चा देहविक्री करणाऱ्या महिलांकडे वळवला आहे. ग्रॅण्ट रोड परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून देहविक्री करणाऱ्या महिला राहतात. दलालांमार्फत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात येते. रात्रीच्या वेळी या परिसरात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असल्याने स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. याबाबतच्या तक्रारींची दखल घेत पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी मोहीम हाती घेतली.

याचाच एक भाग म्हणून पोलिस उपायुक्त रश्‍मी करंदीकर आणि दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत बांगर यांच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री येथील काही इमारतींमध्ये छापा टाकला. या वेळी परिसरात उभ्या आलेल्या १० ते १२ दलालांना पोलिसांनी अटक करत सुमारे २८० महिलांची या दलालांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली. हे छापासत्र शनिवारी सकाळपर्यंत सुरू होते.

महिलेची दुसऱ्या मजल्यावरून उडी
पोलिसांच्या कारवाईला घाबरून एका महिलेने येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये ही महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अशाच कारवाईदरम्यान दोन महिलांनी तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या होत्या. या घटनेत दोघींचा मृत्यू झाला होता.

Web Title: Police raided some buildings in Grant Road area on Friday night and rescued more than 280 women