महामार्गावरील पोलिस भरतीला गालबोट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

विक्रोळी - पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळीजवळ सुरू असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या भरतीला आज गालबोट लागले. भरतीसाठी आलेल्या चार मुली महामार्ग ओलांडत असताना भरधाव असलेल्या टाटा झेनची त्यांना ठोकर बसली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. तर दुसऱ्या घटनेत भर उन्हात भरतीदरम्यान पळताना दोघीजणी चक्कर येऊन पडल्या. 

विक्रोळी - पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळीजवळ सुरू असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या भरतीला आज गालबोट लागले. भरतीसाठी आलेल्या चार मुली महामार्ग ओलांडत असताना भरधाव असलेल्या टाटा झेनची त्यांना ठोकर बसली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. तर दुसऱ्या घटनेत भर उन्हात भरतीदरम्यान पळताना दोघीजणी चक्कर येऊन पडल्या. 

भरतीसाठी धावण्याची चाचणी सध्या सर्व्हिस रोडवर सुरू आहे. आज सकाळी 11 च्या सुमारास पोलिस भरती प्रक्रियेत चार महिला उमेदवार सहभागी झाल्या. त्या विक्रोळी स्थानकाकडे जाताना महामार्ग ओलांडायला गेल्या आणि येणाऱ्या टाटा झेनने त्यांना उडवले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. काजल करडे, दीपाली काळे, चित्राली पांगे, चैताली दोर्गे अशी त्यांची नावे आहेत. कन्नमवारनगरातील महात्मा फुले या पालिका रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. चारही जणींचे वय 19 वर्षे आहे. पुण्यातील शिरूरच्या शिरोळे अकादमीत त्या पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेत आहेत. दीपालीला जास्त दुखापत झाली. तिला शीवच्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. अपघाताप्रकरणी वाहनचालक मोहम्मद खालिद सैद शेख (20) याला विक्रोळी पोलिसांनी ताब्यात घेतले. 

कडक उन्हामुळे दोघी कोसळल्या 
कडक उन्हात भरतीसाठी पळत असताना दोन उमेदवार चक्कर येऊन पडल्या. त्यांनाही महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. गेल्यावर्षीही भर उन्हात झालेल्या भरती प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थ्यांना असा त्रास झाला होता. 

भरती मैदानातच घ्या : मनसे 
पोलिस भरती डांबरी रस्त्यावर न घेता मैदानावर घ्या, अशी मागणी मनसेने केली आहे. प्रशासन पूर्णपणे येथे दुर्लक्ष करत आहे. परीक्षा मैदानी असल्याने मैदानावरच घेतली गेली पाहिजे. मागील पाच ते सहा वर्षांत 10 ते 12 बळी गेले आहेत. आजही जीव जाता जाता वाचले, अशी प्रतिक्रिया मनसेचे शाखाध्यक्ष जयंत दांडेकर यांनी फुले रुग्णालयात रुग्णांची भेट घेतल्यानंतर दिली. 

तात्पुरता निवारा 
विक्रोळीतील एक समाजसेवक प्रवीण यादव यांनी महिला उमेदवारांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला आहे. "राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार येथे येतात. त्यांची राहण्याची व्यवस्था सरकार करत नाही. त्यामुळे या उमेदवारांचा मानसिक ताण वाढतो. तो होऊ नये यासाठी आमच्या गृहनिर्माण संस्थेला विनंती केली. त्यांनी ती ऐकली आणि संस्थेच्या कार्यालयात निवारा उपलब्ध झाला', असे यादव म्हणाले. 

Web Title: police recruitment highway