मुजोर पोलिसाला पत्रकारांनी शिकवला धडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

ठाणे - पोलिस ठाण्यात भेटण्यासाठी आलेल्या पत्रकाराशी हुज्जत घालून मारहाण करणाऱ्या कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या मुजोर पोलिस अधिकाऱ्याला पत्रकारांनी चांगलाच धडा शिकवला. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली बुधवारी सायंकाळी शेकडोंच्या संख्येने पत्रकारांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडल्याने अखेर पोलिसांना नमते घ्यावे लागून मुजोर सहायक पोलिस निरीक्षक वंजारे यांनी पत्रकारांची माफी मागितली. दरम्यान, या माफीनाम्यानंतरही पत्रकारांनी वंजारे यांच्या निलंबनाची मागणी पोलिस आयुक्तांकडे करण्याचा निर्धार केला आहे.

एका हिंदी दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार शेषनारायण त्रिपाठी यांना कापूरबावडी पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक वंजारे यांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्रिपाठी हे पोलिस ठाण्यामध्ये सुरू असलेल्या दोन गटांतील मारहाणीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत असताना वंजारे यांनी मुजोरीने मोबाईल हिसकावून घेऊन त्यांना मारहाण केली. पोलिस ठाण्यात प्रथमच असा निंदनीय प्रकार पत्रकाराबाबत झाला असल्याने पत्रकार संघाच्या वतीने सायंकाळी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून जाब विचारण्यात आला. मात्र, गुर्मीत असलेल्या अधिकारी वंजारे यांनी आपण काहीच केले नसल्याचा आव आणला. अखेर पत्रकारांनी खाक्‍या दाखवताच वंजारे यांनी नंतर घडलेल्या प्रकाराबाबत माफी मागितल्याने तूर्तास या वादावर पडदा पडला.

दरम्यान, कापूरबावडी पोलिस ठाण्यातील सर्व सीसी टीव्ही बंद असल्याचे या मारहाण प्रकरणानंतर उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. तेव्हा, कापूरबावडी पोलिस ठाण्यात दाद मागण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाही येथील पोलिस कर्मचाऱ्यांकडून वाईट वागणूक दिली जात असल्याचा आरोप होत आहे.

Web Title: police reporter issue