पालिका निवडणुकीकरता पोलिसाचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

मुंबई - देवनारमधील शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गंगाराम कांबळे यांनी महापालिका निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला आहे. शिवाजी नगर (देवनार) मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून ते जनमताला कौल लावणार आहेत. शिवाजी नगरमधील अमली पदार्थांची विक्री, महिलांवरील अत्याचार व विकास या मुद्द्यांवर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

कांबळे 1985 मध्ये पोलिस दलात रुजू झाले. 2014 मध्ये त्यांना उपनिरीक्षकपदी बढती मिळाली. शिवाजी नगर परिसरात त्यांनी नशेबाजांविरोधात मोहीम राबवली होती. "एनडीपीएस' कायद्याचा बडगा उगारून अनेकांवर कारवाई केली होती. महिलांवरील अत्याचार रोखण्याकरताही त्यांनी धडक कारवाई केली होती. पाच महिन्यांपूर्वीच त्यांनी पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सादर केला. नुकताच तो आयुक्तालयाने मान्य केला आहे.

शिवाजी नगरमध्ये अनेक समस्या आहेत. तेथील विकासकामे अपूर्ण आहेत. या समस्या सोडवण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. निवडणुकीत हरलो तरी समाजसेवा करतच राहणार आहे, असे ते म्हणाले. पोलिस दलाचा राजीनामा देऊन निवडणूक लढणारे कांबळे हे उपनगरांतील पहिलेच उमेदवार असतील.

Web Title: police resign for municipal election