रासगरब्याला चढला राजकीय रंग

शर्मिला वाळुंज
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

डोंबिवली शहरात नवरात्रीच्या उत्सवात मागील वर्षाप्रमाणेच दोन दिग्गज राजकीय नेत्यांनी यावर्षीही नवरात्री-दांडियाचे आयोजन केले असून युतीचा निर्णय अद्याप झाला नसल्याने दोन्ही पक्षाने आपली ताकद दाखविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणूक काळात नवरात्रोत्सव आल्याने गुजराती, मारवाडी, हिंदी भाषिक मतदारांना खेचण्यासाठी ही चढाओढ सुरू झाली आहे.

ठाणे : डोंबिवली शहरात नवरात्रीच्या उत्सवात मागील वर्षाप्रमाणेच दोन दिग्गज राजकीय नेत्यांनी यावर्षीही नवरात्री-दांडियाचे आयोजन केले असून युतीचा निर्णय अद्याप झाला नसल्याने दोन्ही पक्षाने आपली ताकद दाखविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणूक काळात नवरात्रोत्सव आल्याने गुजराती, मारवाडी, हिंदी भाषिक मतदारांना खेचण्यासाठी ही चढाओढ सुरू झाली आहे. 

डोंबिवली शहरात भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावतीने ‘नमो रमो नवरात्री’ आणि शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावतीने ‘डोंबिवली रासरंग’ या रास-दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवली जिमखाना येथे भाजपचा; तर डीएनसी शाळेच्या मैदानावर हा रास गरबा रंगणार असून भव्यदिव्य मंच उभारण्याची लगबग सध्या मैदानात सुरू आहे.

भाजपाच्यावतीने सावळाराम म्हात्रे क्रीडासंकुल येथे दरवर्षी ‘नमो रमो नवरात्री’ या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा त्याठिकाणी निवडणूक केंद्र असल्याने भाजपने डोंबिवली जिमखाना येथील मैदानावर रंगमंच उभारत येथे नवरात्र उत्सवाचे आयोजन केले आहे. 

विधानसभा निवडणुकीदरम्यान नवरात्रोत्सव आल्याने यंदाच्या दांडियाला ‘राजकीय रंग’ चढणार आहे. वरिष्ठ पातळीवर शिवसेना-भाजप युतीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. यामुळे दोन्ही पक्षांनी आपल्याकडे गर्दी खेचण्यासाठी कंबर कसली आहे.

निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी या कार्यक्रमांच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र, आम्हाला दांडियाची आवड असल्याने तसेच कल्याण-डोंबिवलीसारख्या शहरात भव्य स्वरुपात या कार्यक्रमाचे आयोजन केले जात नसल्याने हा उत्सव सुरू केल्याचे आयोजक सांगत आहेत. भविष्यात युतीची गणिते बदलल्यास हक्काचा मतदारवर्ग जोडलेला असावा, असा दोन्ही पक्षांचा प्रयत्न सुरू आहे.

मनसेची माघार 
सेना-भाजपच्या या राजकीय दांडियाच्या रिंगणात विरोधी पक्ष मनसेनेही उतरण्याचा निर्णय घेतला होता; त्यादृष्टीने त्यांनी हालचालीही सुरू केल्या होत्या. रामनगर बालभवन समोरील मैदानात मनसेचा रासगरबा रंगणार होता; परंतु काही कारणास्तव मनसेच्यावतीने दांडियाचे आयोजन करण्यात आले नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, याविषयी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political color rose to rasgaraba