महाड इमारत दुर्घटनाः अमित शहांकडून दखल; दुर्घटनेवर अन्य नेत्यांनी काय दिल्या प्रतिक्रिया, जाणून घ्या

पूजा विचारे
Tuesday, 25 August 2020

महाड शहरात काजलपुरा परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर राजकारणी नेत्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. रायगडमधील इमारत दुर्घटनेची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही दखल घेतली आहे.

मुंबईः  महाड शहरात काजलपुरा परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे.  सोमवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. यात ४१ कुटुंब राहत होते. त्यातील ६० जणांना बाहेर काढलं असून आतापर्यंत या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर १८ लोक अद्याप आत अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं तात्काळ मदत कार्य सुरू केलं. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरु आहे.  जखमींवर महाडच्या देशमुख रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

याप्रकरणी आता पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये बिल्डर, वास्तुविशारद, आरसीसी सल्लागार, मुख्याधिकारी आणि इंजिनीअर यांचा समावेश आहे. बिल्डर, आर्किटेक्ट यांच्यावर फोजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गंभीर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

या दुर्घटनेनंतर राजकारणी नेत्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

रायगडमधील इमारत दुर्घटनेची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही दखल घेतली आहे. रायगडमधील इमारत दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याबाबत एनडीआरएफच्या महासंचालकांशी बातचीत केली आहे. सगळ्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो, असं ट्वीट अमित शाह यांनी केलं आहे.

 

दुर्घटनेतील जखमी आणि मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकारकडून योग्य ती मदत देणार असल्याची माहिती  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसंच इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे होते. या प्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

रायगड जिल्ह्यात महाड येथे इमारत कोसळून उद्भवलेली आपत्ती दुर्देवी आहे. एनडीआरएफची दोन पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.  जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडून मी सातत्याने आढावा घेतो आहे, असं ट्विट त्यांनी केलं आहे. तसंच शासनाचे आवश्यक ते सर्व सहकार्य मिळेल याचीही ग्वाही मी प्रशासनाला दिली असल्याचंही थोरात यांनी म्हटलं आहे. 

 

महाड (रायगड) येथे इमारत कोसळल्याचं वृत्त धक्कादायक आहे. अनेक लोक या मलब्याखाली असल्याच्या बातम्या येत आहेत.सर्व जण सुखरूप राहतील,अशी प्रार्थना करतो, असं ट्विट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 

 

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार भरत गोगावले आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत महाडमधील इमारत दुर्घटनेबाबत चर्चा केली. जलदगतीने बचावकार्य करण्यासाठी आणि मदतकार्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे मुख्यंमंत्र्यांनी आश्वासन दिले.

 

दुर्घटनाग्रस्त इमारतीचा बिल्डर पसार झाला असून ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल, असं स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी म्हटलं आहे. 

 

महाड इमारत दुर्घटनेत दोषी बिल्डर वर कारवाई करावी अश्या स्पष्ट सूचना रायगड जिल्हाधिकारी आणि रायगड पोलीस अधीक्षक याना केल्या आहेत..कारण ही इमारत फक्त सात वर्षांपूर्वी बांधली होती, असं ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे.

Political leaders given reaction Mahad Building Collapse


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political leaders given reaction Mahad Building Collapse