आजचा दिवस आयाराम-गयारामांचा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 जानेवारी 2017

""एकीकडे भाजपने पारदर्शी कारभाराचा अजेंडा हाती घेतला असताना कॉंग्रेसमध्ये म्हाडामधील भ्रष्ट कंत्राटदारांना तिकिटे देण्याचे काम सुरू आहे. म्हणूनच मी या कारभाराला कंटाळून पारदर्शी कारभाराचा अजेंडा हाती घेणाऱ्या भाजपत प्रवेश केला.''
कृष्णा हेगडे, माजी आमदार

मुंबई - मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे, कॉंग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांच्यासह शिवसेना नगरसेविका लीना शुक्‍ला, मनसेचे नगसेवक भालचंद्र आंबोरे, नगसेवक परविंदसिंग भामरा, शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश नाईक आणि अभिनेते दिलीप ताहिल यांनी आज भाजपात प्रवेश केला, तर दुसरीकडे धारावी आणि सायन येथील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केल्याने आजचा दिवस आयाराम आणि गयारामांमुळे गाजला.

मुंबई भाजप कार्यालयात पक्षांतराचा कार्यक्रम पार पडला. या वेळी मनसेचे विक्रोळी विभागातील माजी आमदार मंगेश सांगळे यांनी भाजपात प्रवेश केला. मंगेश सांगळे हे विक्रोळी कन्नमवार परिसरातून सुरवातीला नगरसेवक त्यानंतर आमदार म्हणून निवडून आले होते. तर या वेळी कॉंग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनीही पक्षप्रवेश केला. दिवंगत शिवसेना नेते डॉ. रमेश प्रभू यांचे ते जावई असून विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या चांदिवली येथील विद्यमान नगरसेविका लीना शुक्‍ला, मनसेचे जोगेश्वरी येथील नगरसेवक भालचंद्र आंबोरे आणि मालाड येथील कॉंग्रेस नगरसेवक परविंदसिंग भामरा यांनीही भाजपात प्रवेश केला. तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश नाईक यांनीही भाजपत प्रवेश केला, तर ख्यातनाम हिंदी सिनेअभिनेते दिलीप ताहिल यांनीही मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ऍड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

""एकीकडे भाजपने पारदर्शी कारभाराचा अजेंडा हाती घेतला असताना कॉंग्रेसमध्ये म्हाडामधील भ्रष्ट कंत्राटदारांना तिकिटे देण्याचे काम सुरू आहे. म्हणूनच मी या कारभाराला कंटाळून पारदर्शी कारभाराचा अजेंडा हाती घेणाऱ्या भाजपत प्रवेश केला.''
कृष्णा हेगडे, माजी आमदार

Web Title: Political parties leader