राजकीय पक्षांपुढे पावसाचे आव्हान 

raining
raining

मुंबई : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा कोणताही नवा मुद्दा नसल्याने उत्साह नव्हताच. सत्ताधाऱ्यांच्या मते निवडणुकीत चुरसही नव्हती. "मी पुन्हा येईन' या फडणवीशी गजरात सुरू झालेल्या प्रचारानंतर आता ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला पावसाने सर्व राजकीय पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. 21 ऑक्‍टोबरला राज्यभरात पावसाची शक्‍यता असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तवले आहे. 

पावसाचे संकट ओढवले असताना मतदारांना कसे बाहेर काढता येईल, याची उमेदवारांनी आखणी सुरू केली आहे. मतदानाचा टक्‍का कायम राहावा आणि पाऊस पडूच नये, पडला तर कमी पडावा, अशी प्रार्थना सुरू केली आहे. सत्ताधारी महायुतीला या वेळी विजयाचा प्रचंड आत्मविश्‍वास असल्याने भाजपने आपल्या ताफ्यातील बुथप्रमुख, पन्नाप्रमुख यांना तातडीने निरोप पाठवले आहेत. मतदार बाहेर पडावेत, यासाठी सकाळपासून आखणी करा, असा निरोप पक्षयंत्रणांकडून दिले जात होते. शिवसेनेनेही मुंबईसह राज्यातील सर्वच मतदारसंघात सकाळीच 35 ते 40 टक्‍के मतदान पार पडेल, याची काळजी घेण्याचे शिवसैनिकांना सुचवले आहे. 

उच्च व मध्यमवर्गीयांचा मतदानाचा टक्‍का कमी होऊ नये, म्हणून काळजी घेण्याचे आव्हान आमच्यासमोर असल्याचे भाजपचे संघटनमंत्री सुनील कर्जतकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केले. सत्तेबद्दलच्या प्रो-इन्कम्बन्सी वातावरणामुळे मतदार बाहेर पडेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या मैदानात प्रथमच उतरलेले आदित्य ठाकरे हे या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला. ते लढत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सांभाळणाऱ्या युवा सेनेचे पदाधिकारी अमोल गजानन कीर्तिकर यांनी प्रत्येक इमारतीत, चाळीत, वस्तीतील मतदारांना बाहेर पडण्यासाठी यंत्रणा सज्ज केल्याचे सांगितले. धारावी मतदारसंघातील कॉंग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी पाऊस पडला, तर मतदानावर काहीसा परिणाम होण्याची भीती व्यक्‍त केली; मात्र मी तसेच पक्षाचे उमेदवार मतदारांशी संपर्क साधून त्यांनी मतदानाला बाहेर पडण्याबाबत आवाहन करू, असे सांगितले. या वेळी मतदानाची टक्‍केवारी वाढेल, असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक अणुशक्‍तीनगर येथून नशीब आजमावत आहेत. त्यांची यंत्रणाही पावसाचा मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून मेहनत घेत आहे. 
------------ 
टक्‍केवारी महत्त्वाची 
मतदानाची टक्‍केवारी वाढल्यास ते सत्ताबदलाचे लक्षण मानले जाते. 1995 मध्ये सत्तापालट होत शिवसेना भाजप युती सत्तेत आली, तेव्हा सर्वाधिक 71.69 टक्‍के एवढे मतदान झाले होते. मतदानाबद्दलचा अनुत्साह ही सार्वत्रिक चिंता असतानाही महाराष्ट्राचा कल साधारणत: 50 टक्‍क्‍यांच्या वर मतदानाकडे राहिला आहे. 1962 मध्ये 60.36 टक्‍के, 1967 मध्ये 64.84 टक्‍के, 1972 मध्ये 60.63 टक्‍के, 1978 मध्ये 67.59 टक्‍के, 1980 मध्ये 53.30 टक्‍के, 1985 साली पुन्हा 53.30 टक्‍के, 1990 मध्ये झालेल्या निवडणुकीत 62.26 टक्‍के, 1999 मध्ये 60.95 टक्‍के, 2004 मध्ये 63.44 टक्‍के, 2009 मध्ये 59.50 टक्‍के मतदान झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com