मोदींचे 'चुनावी जुमले' शिवसेनेकडून व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

पॅकेजच्या पोकळ घोषणांचा घेतला धसका

पॅकेजच्या पोकळ घोषणांचा घेतला धसका
मुंबई - निवडणुकांपूर्वी भाजपकडून होणाऱ्या पॅकेजच्या घोषणांचा सर्वांत जास्त धसका शिवसेनेने घेतला आहे. "चुनावी जुमला' ठरलेल्या या घोषणा व्हायरल करून शिवसेना आतापासूनच भाजपच्या पॅकेजची धार बोथट करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईतील शिवसैनिकांनी यू-ट्यूबवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुमल्यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यास सुरवात केली असून, युतीची चर्चा सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेने भाजपविरोधात छुपा प्रचार करण्यास प्रारंभ केला आहे.

परदेशी बॅंकांत भारतीयांनी ठेवलेला काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याची घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी केली होती. सरकार स्थापन केल्यानंतर मात्र ही घोषणा म्हणजे केवळ "चुनावी जुमला' होता, असे म्हणत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी हात झटकले होते. मोदींनी प्रत्येक निवडणुकीत अशाच मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. बिहारच्या निवडणुकीत सव्वा लाख कोटींचे पॅकेज देण्याचे त्यांनी जाहीर केले होते. मोदींच्या अशा अनेक घोषणा केवळ मते मिळवण्यासाठी होत्या. याबाबतचा व्हिडिओ एका युजरने यू-ट्यूबवर अपलोड केला आहे. त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार मोदींकडे पॅकेजची मागणी करत आहेत; मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत सहा हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता.

राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपकडून अशा पॅकेजच्या घोषणा झाल्यास शिवसेनेला फटका बसू शकतो. त्यामुळे शिवसेना आतापासूनच नागरिकांना सावध करण्यासाठी हे "चुनावी जुमले' व्हायरल करत आहे. युतीविषयीची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. युती होईलच, अशी खात्री नाही. त्यामुळे शिवसेनेने भाजपविरोधात छुपा प्रचार करण्यास सुरवात केली आहे.

Web Title: politics in mumbai