'या' कारणामुळे ठाण्यात घसरला मतदानाचा टक्का 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी दरवर्षीच्या तुलणेत घटली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी दरवर्षीच्या तुलणेत घटली असून याला मुख्य कारण हे मतदारांचे स्थलांतर असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. जिल्ह्यात एकूण 63 लाख 92 हजार 357 मतदारांची नोंद दफ्तरी असली तरी यातील सुमारे 3 लाख 92 हजार मतदारांनी स्थलांतर केल्याचा दावा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

जिल्ह्यातील काही पॉकेट्‌समध्ये कामगार वर्ग बहुसंख्येने आहे. त्यांनी स्थलांतर केल्याने ही नावे वगळली असती तर, मतदानाची आकडेवारी वेगळी आली असती, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आर्थिक मंदीमुळे उद्योगधंदे बंद पडल्याने कामगारांना स्थलांतरित व्हावे लागले का? या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी मत व्यक्त करणे टाळले. 

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघात सोमवारी (ता. 21) सायंकाळी सरासरी 48.49 टक्के मतदान झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला होता. परंतु त्यानंतर अंतिम आकडेवारीमध्ये हा टक्का आणखी घटून 47.91 टक्के इतका झाल्याचे समोर आले. जिल्ह्याच्या शहरी भागात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेने तब्बल अडीच टक्के मतदान कमी झाले. मतदारांचे स्थलांतर आणि मतदार याद्यांमध्ये नावे रद्द करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून राबवली गेली नसल्यामुळे ही घट झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 

मृत, स्थलांतरीत आणि नावे बदललेल्या अनेकांची नावे मतदार याद्यांमध्ये कायम राहिली. भिवंडीतील लूम कामगार, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे पट्ट्यातील कामगार वर्ग स्थलांतरित झाला. तर, काही ठिकाणी शहरी भागात धोकादायक इमारतीमधील नागरिक स्थलांतरित झाले. त्यामुळेच शहरी भागातील मतदारांची टक्केवारी घटल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाकडून मतदानासाठी व्यापक पद्धतीने जनजागृती करून मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले होते. तरीही यात आणखी सुधारणा केली जाईल, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले. 

शहापुरात सर्वाधिक, डोंबिवलीत कमी 

ग्रामीण भागामध्ये मतदार मोठ्या संख्येने मतदानाला उतरल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करत शहापूरमध्ये सर्वाधिक 64.80 टक्के मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले. तर सुशिक्षित शहर असलेल्या डोंबिवलीमध्ये सर्वात कमी 40.72 टक्के मतदान झाले. शहापूर, भिवंडी ग्रामीण आणि मुरबाड हा संपूर्ण भाग ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोडत असून या भागात मतदानाचा टक्का मोठा होता. या भागातील मतदान याद्यांमध्ये घोळ नसल्यामुळे तसेच येथील मतदारांची ओळख पटवणे सहज शक्‍य होते. त्यामुळे या भागातील मतदार टक्का वाढला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Polling percentage dropped in Thane due to 'this' factor