प्रदूषणामुळे २९ गावांना दमा

प्रदुषणाचा पनवेलमधील नागरिकांना फटका
प्रदुषणाचा पनवेलमधील नागरिकांना फटका

दीपक घरत :  सकाळ वृत्तसेवा 
पनवेल ः  मुंबई विद्यापीठाच्या पर्यावरण विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या पालिकेच्या पर्यावरण अहवालात सरकारने पर्यावरणासंबंधी आखून दिलेल्या निकषांतर्गत हवा, पाणी; तसेच ध्वनिप्रदूषणाचे मोजमाप करण्यात आले आहे. पर्यावरण विभागाने तयार केलेल्या अहवालानुसार प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम प्रभाग क्रमांक १ ते ३ मध्ये जाणवत असून पालिका हद्दीत समाविष्ट २९ गावांमधील नागरिकांना यामुळे दम्यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती अहवालात मांडण्यात आली आहे. 

पालिका हद्दीतील पर्यावरणाच्या सद्यस्थितीचे अहवाल तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून येत्या महासभेदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या पर्यावरण विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या अहवालाचे सादरीकरण केले जाणार आहे. पालिका स्थापन झाल्यानंतर जवळपास दोन वर्षांच्या अवधीनंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालात पर्यावरणाच्या स्थितीबाबतीत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्‍यता आहे.

पालिका हद्दीत सुरू असलेल्या विकासकामांचा आणि तळोजा औद्योगिक परिसरात असणाऱ्या कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाचा मोठा परिणाम पर्यावरणावर झाल्याचे वास्तव अहवालातून उघड होण्याची शक्‍यता आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत करण्यात आलेल्या चाचणीत मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असल्याचे समोर आले असून वाढत्या विकासकामांमुळे परिसरातील वनक्षेत्र; तसेच कांदळवन परिसर झपाट्याने कमी होत असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. कांदळवनांची सद्यस्थिती जाणून घेण्याकरिता २००३ ते २००५ दरम्यान सॅटेलाईटद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करण्यात आला आहे.

भूजल प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ
प्रभाग १ ते ३; तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात भूजल प्रदूषण होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून, प्रदूषित पाण्यामुळे होत असलेल्या विविध आजारांचा सामना या भागातील नागरिक करीत आहेत. 

अहवाल तयार करत असताना तंत्रशुद्ध पद्धतीचा वापर करण्यात आला. पर्यावरणासंबंधी करायाच्या उपाययोजनांबाबतही अहवालात माहिती देण्यात आली आहे. लवकरच हा अहवाल जाहीर केला जाणार आहे.
- डॉ. एस. के. कोठे, सह-समन्वयक, पर्यावरण सद्यस्थिती अहवाल समिती, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com