जेएसडब्ल्यूच्या प्रदूषणाने ग्रामस्थ हैराण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

पेण तालुक्‍यातील जे.एस.डब्ल्यू. स्टील कंपनीत होत असलेल्या प्रदूषणाबाबत रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे यांनी गेट रोको आंदोलनाचा इशारा शुक्रवारी (ता. १) घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

पेण (वार्ताहर) : पेण तालुक्‍यातील जे.एस.डब्ल्यू. स्टील कंपनीत होत असलेल्या प्रदूषणाबाबत रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे यांनी गेट रोको आंदोलनाचा इशारा शुक्रवारी (ता. १) घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

डोलवी येथील जे.एस.डब्ल्यू. स्टील कंपनीत एक महिन्यापासून प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे कंपनी परिसरातील डोलवी, गडब, काराव, वडखळ, आमटेम, नवेगाव व परिसरातील शेकडो गावांतील नागरिकांना श्वसन आणि इतर आजार जडले आहे, असे जांभळे यांनी सांगितले. या प्रदूषणामुळे विशेषतः लहान मुले व वृद्धांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. कंपनी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

 ग्रामस्थांनी व आपण अनेक वेळा कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रदूषणाबाबत सूचित केले; मात्र कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुढील १५ दिवसांत हे प्रदूषण नियंत्रण न केल्यास कंपनीचे दोन्ही गेट बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा या वेळी जांभळे यांनी दिला आहे.

प्रदूषण होत आहे; मात्र प्रदूषण रोखण्यासाठी ४ नोव्हेंबरपासून कंपनीत शट डाऊन करण्यात येणार आहे. प्रदूषण रोखण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- आत्माराम बेटकेकर, जनसंपर्क अधिकारी, 
जे.एस.डब्ल्यू. स्टील कंपनी, डोलवी, पेण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pollution in JSW