
धुक्याचे प्रमाण वाढल्याने नवी मुंबईत सर्वांधिक तरंगत्या धूलिकणांची नोंद
मुंबई : लांबलेल्या मान्सूननंतर आता महामुंबईत थंडीची चाहूल लागू लागली आहे. थंडीसोबतच प्रदूषणाची पातळीही वाढू लागली आहे. नवी मुंबईतील प्रदूषणाची पातळी आज धोकादायक श्रेणीत होती; तर मुंबईतील हवा आज संमिश्र होती.
राज्यातील किमान तापमानात घट होत असून महामुंबईतील तापमानही कमी होऊ लागले आहे. शहरात सकाळी धुके पडत असल्याने प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. नवी मुंबईत आज तरंगते धूलिकण (पीएम २.५) चे प्रमाण प्रत्येक घनमीटर हवेत २९६ मायक्रोग्रॅम असल्याचे भारतीय उष्ण कटिबंधीय संस्थेच्या सफर या संकेतस्थळावर नोंदविण्यात आले आहे. हवा आरोग्यासाठी धोकादायक मानली जाते; तर मुंबईच्या प्रदूषणाची पातळी त्यापेक्षा कमीच होती.
मुंबईत आज पीएम २.५ चे प्रमाण १३३ मायक्रोग्रॅम होते; तर गेल्या आठवड्यात हे प्रमाण १०० मायक्रोग्रॅमच्या आत होते. मुंबईत नोव्हेंबर महिन्यात किमान तापमान २१ अंशांपर्यंत असते. अद्याप तापमान २१ अंशापर्यंत आलेले नाही. मुंबईत आज सांताक्रूझ येथे ३३.६ कमाल आणि २२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे; तर पुढील दोन दिवस तापमान असेच राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेन व्यक्त केला आहे.
पीएम २.५ चे प्रत्येक घनमीटर हवेतील प्रमाण (मायक्रोग्रॅममध्ये)
संपूर्ण मुंबई ११३
भांडुप ८५
कुलाबा १०१
मालाड १०१
माझगाव ११७
वरळी ९४ (सुरक्षित पातळी)
बोरिवली ९६ (सुरक्षित पातळी)
वांद्रे-कुर्ला संकुल १७५
चेंबूर ६५ (सुरक्षित पातळी)
अंधेरी १०१
नबी मुंबई २७८