डाळिंबाची आवक घटली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

यंदा लागवडीच्या वेळी पाणी कमी असल्याने व त्यानंतर अतिपावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे आता भाज्यांसह फळांचे उत्पादन घटले आहे. डाळिंब पिकालाही याचा मोठा फटका बसला असून, त्यामुळे बाजारात डाळिंबाची आवक कमी प्रमाणात होत आहे.

नवी मुंबई : यंदा लागवडीच्या वेळी पाणी कमी असल्याने व त्यानंतर अतिपावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे आता भाज्यांसह फळांचे उत्पादन घटले आहे. डाळिंब पिकालाही याचा मोठा फटका बसला असून, त्यामुळे बाजारात डाळिंबाची आवक कमी प्रमाणात होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून आखाती देशांसह युरोपीय आणि अमेरिकेचीही बाजारपेठ डाळिंबासाठी खुली झाली आहे. त्यामुळे बाजारात डाळिंबांना मोठी मागणी आहे. मात्र, कमी उत्पादन आणि उच्च दर्जाच्या डाळिंबाची आवक बाजारात कमी असल्याने, ही मागणी पूर्ण करणे व्यापाऱ्यांना शक्‍य होत नसल्याची परिस्थिती आहे.

गेल्या काही वर्षांपासून बाजारात उत्तम दर्जाच्या, मोठ्या आकाराचे आणि मोठे दाणे असणाऱ्या डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील डाळिंब परदेशात निर्यात करता येत आहेत. डाळिंबातील गुणधर्मामुळे डाळिंबांना बाजारात मागणी असते. मात्र, या वर्षी चित्र उलटे आहे. एप्रिल महिन्यात लागवड झालेल्या रोपांना मे महिन्यापासून पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागला आहे, तर पावसात आता अतिपावसाचा मारा सहन करावा लागला आहे. त्यामुळे मोठ्या आकाराची डाळिंबाची बाजारात सध्या केवळ निम्मीच आवक होत आहे. तसेच त्यांचे दरही गेल्या वर्षीच्या मानाने वाढीव आहेत. घाऊक बाजारात सध्या सातशे ते आठशे क्विंटल डाळिंबाची आवक होत आहे. नेहमी ही आवक हजार क्विंटलच्या घरात असते. सोलापूर, संगमनेर, सांगोला भागातून चांगल्या प्रकारची डाळिंब बाजारात येतात. तसेच फलटण, बारामतीमधूनही अधूनमधून डाळिंब येतात. मात्र यावर्षी हे प्रमाण कमी आहे.

१५० ते २०० रुपये किलो
गेल्या वर्षी किरकोळ बाजारात उत्तम दर्जाचे डाळिंब ६० ते ८० रुपये किलो, तर त्याखालोखाल ५० रुपये किलो दर होता. मात्र, यावेळी घाऊक बाजारात उत्तम दर्जाच्या डाळिंबाचा दर ८० ते १०० रुपये किलो आहे. किरकोळ बाजारात हे डाळिंब १५० ते २०० रुपये किलो आहेत. म्हणजेच या वर्षी हे दर दुप्पट झाले आहेत.

डाळिंबाची बाजारात सध्या केवळ निम्मीच आवक होत आहे. तसेच त्यांचे दरही गेल्या वर्षीच्या मानाने वाढीव आहेत. या वर्षी डाळिंबाची आवक कमी असल्याने बाजारात मागणीइतका पुरवठा होत नाही. त्यामुळे निर्यात करण्यातही अडचणी येत आहेत.  
- बाळासाहेब बेंडे, व्यापारी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomegranate arrivals declined