"त्या' सोहळ्यास्थळी महिलाच दीन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

ठाणे - जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र सोहळे साजरे होत असताना ठाण्यात मात्र महिला "दीन' असल्याचे विदारक चित्र निदर्शनास आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतलेल्या महिला सक्षमीकरणाच्या सोहळ्याशेजारील शुभेच्छा फलकाजवळ एक अनाथ असहाय महिला चक्क भिक्षेच्या प्रतीक्षेत बसली होती. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिक, कर्मचाऱ्यांनी, तसेच एकाही महिलेने तिच्याकडे ढुंकूनही बघितले नाही. अखेर दक्ष नागरिक राजीव दत्ता तिच्या मदतीसाठी धावले. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील या महिला रॅलीसाठी ठाण्याच्या नूतन महापौर मीनाक्षी शिंदे यादेखील आवर्जून उपस्थित होत्या.

ठाणे - जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र सोहळे साजरे होत असताना ठाण्यात मात्र महिला "दीन' असल्याचे विदारक चित्र निदर्शनास आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतलेल्या महिला सक्षमीकरणाच्या सोहळ्याशेजारील शुभेच्छा फलकाजवळ एक अनाथ असहाय महिला चक्क भिक्षेच्या प्रतीक्षेत बसली होती. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिक, कर्मचाऱ्यांनी, तसेच एकाही महिलेने तिच्याकडे ढुंकूनही बघितले नाही. अखेर दक्ष नागरिक राजीव दत्ता तिच्या मदतीसाठी धावले. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील या महिला रॅलीसाठी ठाण्याच्या नूतन महापौर मीनाक्षी शिंदे यादेखील आवर्जून उपस्थित होत्या. मात्र, त्यांचेही त्या महिलेकडे लक्ष गेले नसल्याचे दत्ता यांनी सांगितले. 

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची दुचाकी रॅली घेण्यात आली होती. डोक्‍याला हेल्मेट, बूट, टी-शर्टस्‌ अशा पेहरावात सुमारे 50 ते 60 महिलांनी बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन या रॅलीत सहभाग घेतला. तसेच महिला सक्षमीकरणाच्या घोषणा देत ही रॅली पार पडली. या वेळी महापौर शिंदे यांनी रॅलीत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आनंद होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत महिला सक्षमीकरणाचा उपदेश दिला. 

या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी फरोग मुकादम आदी उपस्थित होते. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयातून तलावपाळी येथून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयातच विसर्जित झाली. 

याच सोहळ्यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावलेल्या महिला दिनाच्या शुभेच्छा फलकाजवळ कडाक्‍याच्या उन्हात एक असहाय महिलाच भिक्षा मागत बसल्याचे विदारक चित्र दिसून आले. हे दृश्‍य पाहून हृदय द्रवलेल्या दक्ष नागरिक दत्ता यांनी त्या महिलेची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या महिलेला बोलताही येत नसल्याने दत्ता यांनी तिला बिस्किटे खाऊ घालून कर्तव्य बजावले. तसेच जागतिक महिलादिनी चक्क महिला दिनाच्या शुभेच्छा फलकानजीकच महिलेची अशी दुर्दशा पाहून त्यांनी खंत व्यक्त केली. 

Web Title: poor women