भिवंडी पालिकेची निवडणूक रद्द होण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

११ कर्मचारी निलंबित
भिवंडी पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी निवडणूक याद्यांतील घोळप्रकरणी ११ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. व्ही. आर. पाटील, गौतम जाधव, अरुण कदम, सुनील पाठारी, गणेश विभुते, पंडित भोईर, रमेश गायकवाड, मोहन जाधव, प्रमोद जाधव, गजानन पाटील, दीपक बोपटे अशी निलंबित लिपिकांची नावे आहेत. 

भिवंडी - भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या प्रभागनिहाय प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. यात ५० हजारांहून अधिक बोगस, दुबार मतदारांची नावे याद्यांमध्ये घुसविण्यात आल्याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी करत येथील नागरिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात उद्या (ता. २४) सुनावणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने बोगस मतदार याद्यांबाबत जबाबदारी झटकत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवल्याने न्यायालयाने आयोगाने न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे भिवंडी महापालिकेची निवडणूक रद्द होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक २४ मे रोजी जाहीर केली आहे. त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे; मात्र निवडणुकीसंबंधी प्रभागनिर्मिती आणि मतदार याद्यांमधील बोगस नावांच्या घुसखोरीबाबत नागरिकांनी राज्य निवडणूक आयोग, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्रसिंग कल्याणकर, तहसीलदार वैशाली लंभाते यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर याविरोधात शिवसेनेचे विभागप्रमुख संजय काबुकर, माजी नगरसेवक सिद्धेश्‍वर कामूर्ती, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंटचे फाजील अन्सारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. याचिकांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली. यात राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी नावे वगळण्याचे अधिकार आमच्या हातात नसून ते केंद्रीय निवडणूक आयोगाचे असल्याचे सांगून जबाबदारी झटकली. 

Web Title: The possibility of cancellation of election of Bhiwandi Municipal Corporation