हजारो कुटुंबांचा जीव धोक्‍यात; धोकादायक इमारती कोसळण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

वाशीतील सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींची दिवसेंदिवस बिकट होत चाललेली अवस्था लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात काही इमारती कोसळण्याची दाट शक्‍यता महापालिकेतर्फे वर्तवण्यात येत आहे.

नवी मुंबई  - वाशीतील सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींची दिवसेंदिवस बिकट होत चाललेली अवस्था लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात काही इमारती कोसळण्याची दाट शक्‍यता महापालिकेतर्फे वर्तवण्यात येत आहे. यात श्रद्धा आणि गुलमोहर सोसायटीतील इमारतींचा समावेश असू शकतो. दुर्घटनेमध्ये जीवितहानी होऊ नये म्हणून महापालिकेने इमारतींच्या वीज व नळजोडण्या खंडित करून सोसायट्या रिकम्या करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत; परंतु रहिवाशांनाही पर्यायी व्यवस्था नसल्याने त्यांनी घराबाहेर पडण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत एवढी वर्षे मूग गिळून बसलेले नवी मुंबईचे सत्ताधारी आता निवडणुकीच्या दृष्टीने सहानुभूती मिळवण्यासाठी रहिवाशांची समजूत घालण्यासाठी धडपडताना दिसतात. 

15 वर्षे नवी मुंबईत पुनर्बांधणीचा मुद्दा गाजत आहे; परंतु ठोस निर्णय व पुनर्बांधणीच्या संथगतीच्या हालचालींमुळे जेएन-1 व जेएन-2 प्रकारातील इमारतींची दुरवस्था होतच गेली. सध्या वाशीतील तब्बल 55 इमारती सी-1 प्रकारात म्हणजे अतिधोकादायक असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. या इमारतींचे महापालिकेच्या तज्ज्ञ समितीमार्फत केलेल्या बांधकाम परीक्षणात केव्हाही कोसळण्याची शक्‍यता वर्तवली आहे. पावसाळ्यात इमारत कोसळण्याचा धोका अधिकच बळावत असल्यामुळे सोसाट्याचा वारा आणि मुळधार पाऊस पडल्यास तडे गेलेले स्लॅब पाण्याने भिजून कोसळण्याची भीती प्रशासनाला वाटत आहे. 

सेक्‍टर 9 मध्ये जेएन -2 प्रकारातील गुलमोहोर, आशीर्वाद, सुवर्णसागर, जय महाराष्ट्र, अवनी या सोसायटीतील बहुतांश इमारतींच्या स्लॅबला भेगा गेल्या आहेत. काही स्लॅबने तर भिंती सोडल्या आहेत. इमारतींच्या वरच्या मजल्यांवर राहणारी कुटुंबे भीतीने घर सोडून गेली आहेत; मात्र पहिल्या व तळमजल्यावर राहणाऱ्या कुटुंबांचा जीव धोक्‍यात आहे. सेक्‍टर 10 मध्ये श्रद्धा सोसायटीतील 7 इमारती तोडण्यात आल्या आहेत. उर्वरित 16 इमारती शिल्लक असून काही इमारतींमध्ये रहिवासी राहत आहेत. 

अवनी इमारतीच्या परिसरात संक्रमण शिबिर तयार करण्याचे काम विकासकातर्फे सुरू आहे. जेएन-1 प्रकारातील एकता, नक्षत्र, कैलाश आणि शांतीकुंज सोसायटीतील इमारतीही पावसाळ्यात केव्हाही कोसळतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी मुसळधार पावसाच्या वेळी छताचा भाग पत्त्यासारखा पडत असल्याचे भयानक दृश्‍य डोळ्याने पाहिल्याने कुटुंबासहीत घर सोडले, अशी प्रतिक्रिया जेएन-2 मधून स्थलांतरित झालेल्या एका रहिवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

नेमकी भूमिका कोणती? 
नवी मुंबईतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुनर्बांधणीच्या मुद्द्यावर 15 वर्षे निवडणूक लढवली; परंतु तो प्रश्‍न अद्याप खितपतच पडला आहे. गुलमोहोर सोसायटीच्या पुनर्विकासाला महापालिकेने लागू केलेल्या अडीच एफएसआयवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकाने सर्वसाधारण सभेत आक्षेप घेतला होता. त्याच पक्षातील नेते आता या ठिकाणी रहिवाशांची समजूत घालण्यासाठी बैठका घेत असल्याने रहिवाशांमध्ये संभ्रमवस्था निर्माण झाली आहे. 

प्रशासनाची सावध भूमिका 
मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना वारंवार घरे रिकामी करण्याच्या नोटिसा देऊनही घरे रिकामी केलेली नाहीत. अशा इमारतींची वीज व नळजोडण्या बंद करण्याच्या महापालिकेच्या कारवाईवरही राजकीय दबावापोटी स्थगिती आली आहे. या परिस्थितीत पावसाळ्यात इमारत कोसळून दुर्घटनेत जीवितहानी झाल्यास प्रशासनाने त्यावर स्पष्टीकरण तयार करण्याच्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. उच्च न्यायालयात उपस्थित होणाऱ्या प्रशांना उत्तर देण्यासाठी संक्रमण शिबिरापासून ते बदललेल्या धोरणांचे मुद्दे यात समाविष्ट करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The possibility of collapsing dangerous buildings in washi