मरणोत्तर नेत्रदानाच्या मार्गातही अडथळे

नेत्वा धुरी  
सोमवार, 23 जुलै 2018

मुंबई - राज्यात डोळ्यांसाठी दृष्टीहिनांची प्रतीक्षा यादी मोठी असतानाही मरणोत्तर नेत्रदानासाठी नेत्र बॅंकांचीच संख्या पुरेशी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दक्षिण कोकण व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही नेत्र बॅंका उपलब्ध नाहीत. ३५ पैकी १४ जिल्ह्यांमध्ये एकही नेत्र बॅंक नसल्याने नेत्रदानात मोठा अडथळा अद्यापही कायम आहे.

मुंबई - राज्यात डोळ्यांसाठी दृष्टीहिनांची प्रतीक्षा यादी मोठी असतानाही मरणोत्तर नेत्रदानासाठी नेत्र बॅंकांचीच संख्या पुरेशी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दक्षिण कोकण व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही नेत्र बॅंका उपलब्ध नाहीत. ३५ पैकी १४ जिल्ह्यांमध्ये एकही नेत्र बॅंक नसल्याने नेत्रदानात मोठा अडथळा अद्यापही कायम आहे.

मृत्यूपश्‍चात सहा तासांच्या आत नेत्रदान व्हायला हवे अन्यथा डोळ्यांतील कोर्निया प्रत्यारोपणासाठी उपयोगी राहत नाही; परंतु राज्यात केवळ ७३ नेत्र बॅंका उपलब्ध आहेत. राज्यभरात केवळ मुंबई जिल्ह्यात ११ नेत्र बॅंका उपलब्ध आहेत. त्याखालोखाल पुण्यात ९, सांगलीत ८, नाशिक ५, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, अहमदनगर या जिल्ह्यांत प्रत्येकी ४ नेत्र बॅंका उपलब्ध आहेत. सोलापूर, जळगाव, लातूर येथे प्रत्येकी ३, जालना, कोल्हापूर, ठाणे, वर्धा, धुळे या जिल्ह्यांत प्रत्येकी २ नेत्र बॅंका उपलब्ध आहेत; तर सातारा, रायगड, नांदेड, यवतमाळ, अकोल्यात केवळ एकच नेत्र बॅंक उपलब्ध आहे. बुलढाणा, हिंगोली, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, पालघर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम आणि नंदुरबार जिल्ह्यांत एकही नेत्र बॅंक उपलब्ध नाही. यामुळे राज्याला नेत्रदानाचा अपेक्षित टप्पा गाठायला असंख्य अडचणी येत आहेत.

विदर्भात हलाखीची स्थिती
दक्षिण कोकणात नेत्र बॅंका उपलब्ध नसल्याने सांगलीतील नेत्र बॅंकांची मदत घेतली जाते. दक्षिण कोकणतील एका नावाजलेल्या रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञही मृत्यूपश्‍चात नेत्र मिळण्यासाठी प्रयत्न करतात, अशी माहिती फेडरेशन ऑफ बॉडी ॲण्ड ऑर्गन डोनेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार देतात. विदर्भात तर अजूनच हलाखीची परिस्थिती असल्याची चिंताही त्यांनी व्यक्‍त केली; परंतु नेत्र बॅंका उभारण्याऐवजी मृत्यूपश्‍चात रुग्णाकडून नेत्र मिळण्यासाठी नेत्रदान केंद्र प्रत्येक जिल्ह्यांत उभारणे गरजेचे असल्याच्या मुद्द्यावर पवार लक्ष वेधतात. हे केंद्र उभारले तर प्रत्येक जिल्ह्यांत नेत्रदानाची चळवळ चांगली उभारली जाईल, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

प्रत्येक जिल्ह्यांत आरोग्य विभागाची नेत्रदान टीम (आय रिट्रायव्हल टीम) तयार केली आहे. यात प्रत्येक जिल्ह्यांतील नेत्रतज्ज्ञांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मृत रुग्णांचे नेत्र घेतले जातात; परंतु अद्यापही नेत्रदानासाठी अपेक्षित आकडेवारी आपण गाठलेली नाही. नेत्रदानासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती हवी आहे. 
- डॉ संजीव कांबळे, संचालक, आरोग्य संचालनालय

Web Title: Posthumous eye donation