महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. १२) विश्रांती घेतल्याने शीव-पनवेल महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यात आले. शुक्रवारी दिवसभर पावसाने दडी मारल्यामुळे पुण्याकडे व मुंबईकडे अशा दोन्ही मार्गावर पडलेले खड्डे खडी व ग्रीट टाकून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बुजवण्याचे काम करण्यात आले.

नवी मुंबई -  आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. १२) विश्रांती घेतल्याने शीव-पनवेल महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यात आले. शुक्रवारी दिवसभर पावसाने दडी मारल्यामुळे पुण्याकडे व मुंबईकडे अशा दोन्ही मार्गावर पडलेले खड्डे खडी व ग्रीट टाकून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बुजवण्याचे काम करण्यात आले. खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्यामुळे नेरूळ येथे डी. वाय. पाटील स्टेडियमसमोरील रस्त्यावर काही वेळेकरिता वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने नवी मुंबई शहराला पुरते झोडपून काढले. सोमवारी (ता. ८) झालेल्या पावसाने तर शीव-पनवेल महामार्ग पाण्याखाली गेला होता. पावसासह वाहनांमुळे महामार्गावर वाशी गाव, वाशी उड्डाणपुलाखाली, सानपाडा उड्डाणपूल, जुईनगर, नेरूळ, सीबीडी-बेलापूर आदी ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. महामार्गावरील काँक्रीटीकरणाचा भाग सोडल्यास रस्त्याच्या बरोबर मध्येच असणाऱ्या उर्वरित डांबरी भागात खड्डे पडल्याने अचानक खड्डा येऊन अपघात होण्याची शक्‍यता आहे; परंतु पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी जाऊन हे खड्डे समांतर झाले होते. त्यामुळे अनेक वाहने खड्ड्यांचा अंदाज न आल्याने जोराने आपटत होते. त्यामुळे शुक्रवारी पावसाने विश्रांती घेताच सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली. वाशी टोलनाक्‍यापासून ते कळंबोली सर्कलपर्यंत दोन्ही मार्गिकेवर खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते. मोठ्या आकाराच्या खड्ड्यांत मोठी खडी व ग्रीट टाकून खड्डा बुजवला जात होता. नेरूळ येथे डी. वाय. पाटील स्टेडियमसमोरील रस्त्यावरदेखील पडलेले मोठे खड्डे बुजवण्यात आले. खड्डे बुजवताना मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The potholes on the highway