पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत! चक्रीवादळात तडाख्यानंतर सरकारचे दुर्लक्ष 

प्रमोद जाधव | Friday, 27 November 2020

बेरोजगारीमुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुण मोठ्या संख्येने पोल्ट्री व्यवसायाकडे वळत आहेत; परंतु पावसाळ्यात आलेल्या चक्रीवादळात या व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही सरकारने दुर्लक्ष केले आहे.

अलिबाग: बेरोजगारीमुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुण मोठ्या संख्येने पोल्ट्री व्यवसायाकडे वळत आहेत; परंतु पावसाळ्यात आलेल्या चक्रीवादळात या व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अनेक जण व्यवसायातून काढता पाय घेण्याच्या विचारात आहेत. चक्रीवादळात दोन हजार पोल्ट्री व्यावसायिकांना फटका बसला. या व्यवसायावर सुमारे 10 हजारपेक्षा अधिक जणांची कुटुंबे उदनिर्वाह करत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

हेही वाचा - तुळशी विवाहाचे आमंत्रण सुरु; लग्न पत्रिका सोशल माध्यमात व्हायरल

रायगड जिल्ह्यात भातशेती व्यवसाय प्रामुख्याने करण्यात येतो. 15 ते 20 वर्षांपूर्वी शेतीबरोबरच पुरक व्यवसाय म्हणून जिल्ह्यातील बेरोजागार तरुण पोल्ट्री व्यवसायाकडे वळले. त्यामुळे हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ लागला. हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असताना 23 मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या काळात व्यवसायावर मोठे आर्थिक संकट कोसळले. त्यात 3 जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे सुमारे 700 पोट्री जमीनदोस्त झाल्या, तर अन्य अनेकांच्या शेडचे पत्र्यांसह वस्तू आणि कोंबड्या दगावल्या. त्यामुळे जिल्ह्यातील दोन हजार पोल्ट्री व्यावसायिकांसह 10 हजार कामगारांसमोर मोठे आर्थिक संकट कोसळले. अनेकांकडे तर उत्पन्नाचे साधन नसल्याने उपासमारीची वेळ आली. 

Advertising
Advertising

हेही वाचा - वसई विरारमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य; कचरा वर्गीकरणावर पालिकेचे दुर्लक्ष

निसर्ग चक्रीवादळात पोट्री व्यवसायिकांचे सुमारे 25 कोटी रुपयांचे नुकसान झाले. ही भरपाई मिळावी म्हणून रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी तहसीलदारांपासून जिल्हाधिकारी, आमदार, पालकमंत्री व खासदारांकडे निवेदन दिले. त्यानंतरही पोल्ट्री व्यावसायिकांपर्यंत कोणत्याही प्रकारची मदत पोहचली नाही. त्यामुळे या व्यावसायिकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. आता हे व्यावसायिक आक्रमक भूमिका घेऊन लवकरच आंदोलन करणार आहेत. 

असे आहे पोल्ट्री व्यावसायिकांचे म्हणणे 
- शेडसाठी लावण्यात येणारा ग्रामपंचायत कर शेतीपुरक व्यवसाय या पद्धतीने घ्यावा. 
- पोल्ट्रीसाठी आकारण्यात येणारे वीजबिल शेतीपूरक व्यवसाय म्हणून आकारावीत. 
- व्यवसायासाठी बॅंकाकडून लवकर कर्ज पुरवठा करावा. 
- गेल्या सहा महिन्यांत थकबाकीदार असलेल्या व्यक्तींना कर्जाची पुनर्रचना करून नवीन कर्ज द्यावे. 
- पोल्ट्रीशेड व जिवंत पक्ष्यांना विमा संरक्षण द्यावे. 
- मांसल पक्ष्यांना हमी भाव द्या 

 

लॉकडाऊनच्या काळात पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडला असताना, चक्रीवादळातही प्रचंड नुकसान झाले. सरकारकडे वारंवार निवेदने देऊनही सरकारकडून पोल्ट्री व्यवसायिकांना मदत करण्याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन पुकारले जाईल. 
- अनिल खामकर,
अध्यक्ष, रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्था.

Poultry business in trouble Government neglect after hurricane hit

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )